या सरकारने पाच वर्षांत ठोस काम केलेले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे असा थेट आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.  १७ जून दुष्काळ दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या प्रश्नावर सरकारला धारेवर धरणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरले असून त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहितीही  धनंजय मुंडे यांनी दिली.

दुष्काळग्रस्त भाग असताना महाराष्ट्रात शाश्वत विकास दिसला नाही परंतु दुष्काळाने राज्य होरपळत आहे. विकास झाला तो आभासी विकास असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. सरकारचे दुष्काळाकडे लक्ष नाही. आम्ही दुष्काळ भाग पिंजून काढला आहे. राज्याचे मंत्रीसुध्दा दुष्काळी भागात फिरकले नाहीत.  शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती ती मान्य केली नाही परंतु ती मागणी या अधिवेशनातही लावून धरणार आहे. सरसकट कर्जमाफी द्यावी ही मागणीही लावून धरणार आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हा फक्त अाभास निर्माण करण्यात आला होता असेही धनंजय मुंडे म्हणाले.

४५ वर्षात जेवढी बेरोजगारी वाढली नाही तेवढी बेरोजगारी यावेळी वाढली आहे. राज्यातील बेरोजगारी संपली असा फक्त आभास निर्माण केला गेला आहे. त्यामुळे आम्ही बेरोजगारांना दरमहा रोजगार भत्ता द्यावा ही मागणी सभागृहात लावून धरणार आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले. नाणारचा प्रकल्प गुजरातला नेला जातोय.आरक्षणाचाही आभास निर्माण केला गेला आहे. राज्यातील एसएससी बोर्डात देण्यात येणारे २० गुण कमी करुन ते सीबीएसई बोर्डात का देण्यात आले असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. पानसरे, दाभोळकर यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः कडचे खाते बाजुला करुन गृह खात्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नेमावा अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. गृहनिर्माण हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. बिल्डर धार्जिणे हे सरकार आहे. यावर आम्ही आवाज उठवणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. राज्यात दुष्काळात आम्ही फिरलो, मात्र सरकार, मंत्री कुठेच दिसले नाहीत, मुख्यमंत्र्यांनी एसीमध्ये बसून आढावा घेतला आणि शिवसेनेच्या प्रमुखांना विदेशवारी नंतर आता शेतकऱ्यांची आठवण आली आहे असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. आज ६ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात आले आहे मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दीड डझन मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी काढायला हवे होते असेही धनंजय मुंडे म्हणाले.  १२०० कोटीचा एफएसआय घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहता यांना केवळ मंत्री मंडळातुन काढून काही होणार नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. रोजगार निर्माण करण्यात सरकारला अपयश आले आहे. बेरोजगार तरुणाना भत्ता दिला पाहिजे. राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे, कर्जाचा डोंगर आहे. आर्थिक बाबतीत उत्तम असल्याचा केवळ आभास निर्माण केला जात आहे. स्मार्ट सिटीचे काम नाही, केवळ आभास आहे. राज्यात उद्योगाची बिकट परिस्थिती आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.प्रशासकीय आणि पोलीस बळाच्या जोरावर दबाव टाकणे आणि फोडाफोडी करण्यातच सरकारचा वेळ जात आहे. फोडाफोडीचे नवे खाते काढुन गिरीष महाजन यांना त्याचे मंत्री करा असा टोला धनंजय मुंडे यांनी गिरीश महाजन यांना लगावला. याशिवाय अधिवेशनात राज्यातील अनेक प्रश्नांवर आवाज उठवणार आहे असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.