पालघर : संपूर्ण पावसाळ्याच्या हंगामात असंख्य खड्डय़ांनी चाळण झालेल्या पालघर-बोईसर मार्गावर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा दौरा आखला गेल्याने या रस्त्यावरील खड्डे चक्क १२ तासांत बुजवण्यात आले. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना निदान काही दिवस सुखाने प्रवास करणे शक्य होणार आहे.

पालघर- बोईसर रस्ता हायब्रीड अ‍ॅन्युइटी योजनेअंतर्गत एका खासगी संस्थेला देखभाल दुरुस्तीसाठी गेल्या वर्षीपासून हस्तांतरित करण्यात आला होता. या रस्त्यावर नियमितपणे डागडुजी होत नसल्याने कोळगाव, उमरोळी, पांचाळी व सरावली या भागात असंख्य खड्डे पडले होते. या मार्गावरील काही भागात एक ते दीड फुटांचे खड्डे असल्याने वाहने धोकादायक प्रवास करत असत.

या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी म्हणून उमरोळी व इतर नागरिकानी अनेक तक्रारी केल्यानंतर गेल्या शनिवारपासून सरावली येथून रस्त्याचे डागडुजी काम नव्याने सुरू करण्यात आली होती. मात्र शनिवार व रविवारी झालेल्या मुसळधार पावसात रस्त्यावरील खड्डय़ात टाकण्यात माती पुन्हा वाहून गेली होती. सोमवार सायंकाळपर्यंत या रस्त्याची दयनीय अवस्था कायम होती. संबंधित ठेकेदाराने सोमवारच्या रात्रीमध्ये हा मार्ग दुरुस्त केला आहे.

पालघर-मनोर रस्त्याची डागडुजी

पालघर-मनोर रस्त्याची मागील अनेक महिन्यांपासून अतिशय दुरवस्था झाली होती. मात्र स्थानिकांच्या अनेक दुरुस्तीच्या मागणीनंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र मंगळवारी आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा पालघरमध्ये संपन्न झाली. त्याच्या पूर्वसंध्येलाच सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले व त्यांनी मध्यरात्रीपासून येथील रस्ते दुरुस्त केले आहे.