|| निखिल मेस्त्री

पालघर-बोईसर रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोडीला सुरुवात:- मेट्रो कारशेडसाठी आरे येथील वृक्षकत्तलीचे प्रकरण ताजे असतानाच आता पालघर-बोईसर रस्त्याच्या रुंदीकरणासाठीही तब्बल २९१ झाडांचा बळी दिला जात आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वृक्षतोडीस गुरुवारपासून सुरुवात झाली असून त्यामुळे पर्यावरणवादी आणि परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पालघर-बोईसर रस्त्याचे दोन्ही बाजूने सव्वादोन मीटरने रुंदीकरण केले जाणार आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या २९१ झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली ही झाडे कापण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाची रीतसर परवानगी घेतली असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ठेकेदारांमार्फत गुरुवारी संध्याकाळपासून जिल्हा मुख्यालय असलेल्या ठिकाणांहून झाडे कापायला सुरुवात करण्यात आली आहे.

काही पर्यावरणवाद्यांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला असता  रीतसर परवानगी घेऊन त्यानंतरच ही झाडे कापली जात असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी ही झाडे कापण्याच्या बदल्यात पर्यायी वनीकरण करणे अपेक्षित असताना हे वनीकरण करण्याअगोदर ही झाडे कापायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वनविभागाने ही परवानगी देताना दिलेल्या अटीचे  पालन न करता ही झाडे भुईसपाट केली जात आहेत. वनविभागाने दिलेल्या परवानगीमध्ये कापण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात या वर्षीच्या पावसाळ्यात तिप्पट झाडे वनीकरण (वृक्षारोपण) करावयाचे आहे, असे असलेल्या या अटीचे पालन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत न झाल्यामुळे ही वृक्षतोड तातडीने थांबवावी ही पर्यावरणवाद्यांची मागणी आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली झाडे वनविभागाच्या नियमांप्रमाणे बिगर अनुसूचीमधली तसेच हलक्या प्रजातीची आहेत. त्यामुळे ती तोडण्यास कोणताही अडथळा येणार नाही, असे वनविभाग म्हणत असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषण थांबवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या तसेच प्राणवायू देणारी ही असंख्य झाडे पर्यावरणपूरक आहे, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही वृक्षतोड थांबवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वनीकरणाकडे दुर्लक्ष

पालघर-बोईसर रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या कत्तलीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २१ फेब्रुवारी २०१९ रोजी परवानगी मागितली होती. त्याअनुषंगाने वनविभागाने सर्व रीतसर बाबी लक्षात घेत ऑगस्टमध्ये ही झाडे कापण्यास सशर्त अटी घालून परवानगी दिली होती. त्यामध्ये पावसाळ्यात तीन पटीने पर्यायी वनीकरण करणे होते. मात्र असे कोणत्याही प्रकारचे वनीकरण करण्यात आलेले नाही. आता हे वनीकरण करण्यात आले तर ती रोपे व्यवस्थित राहणार नाहीत. ते रुंदीकरणानंतर करणार असल्याचे बांधकाम विभागाने म्हटले आहे.

ठेकेदारांकडून फायदा

सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषद, नगर परिषद आदी विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामांत जोडून घेतले आहेत. या परिस्थितीत या विभागामार्फत कुठेही काम सुरू ठेवल्यास त्यावर विभागाची तिथे देखरेख राहणार नाही. ठेकेदार नेमका याच संधीचा लाभ उठवत या काळात आपली कामे उरकून घेत आहे. या पाश्र्वभूमीवर संबंधित सर्व विभागांनी निवडणूक कालावधीत ठेकेदारांना ही कामे सुरू न ठेवण्याचे आदेश द्यायला हवेत. मात्र तसे होत असल्याचे प्रत्यक्षात दिसत नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाकडे रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोडीची परवानगी मागितली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार या झाडांवर कुऱ्हाड चालवण्यासाठी काही अटी टाकून परवानगी दिलेली आहे. – पी. एस. पवार, वनक्षेत्रपाल, पालघर

वनविभागाने पर्यायी वनीकरण करण्यासंदर्भात दिलेल्या अटींचे पालन झालेले नसल्याने ही वृक्षतोड थांबवावी. वृक्षतोडीची परवानगी घेतली असली तरी ही झाडे पर्यावरणपूरक आहेत ही वस्तुस्थिती आहे. – भूषण भोईर, पर्यावरणवादी कार्यकर्ते

प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम मंजूर असून या कामामध्ये आवश्यक त्या ठिकाणी झाडे कापण्यात येणार आहे. कापलेल्या झाडांच्या मोबदल्यात पर्यायी वनीकरण करण्यात येणार आहे – महेंद्र किणी, उपविभागीय अभियंता, सार्व. बांधकाम विभाग