पालघर जिल्ह्य़ातील मासवण, तलासरी तालुक्यांमध्ये तपासणी शिबिरे

पालघर जिल्ह्य़ातील कुपोषणनिर्मूलनास प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत गर्भवती आणि स्तनदा तसेच सहा वर्षांपर्यंतच्या बालकांची तपासणी शिबिरे पालघर तालुक्यातील मासवण आणि तलासरी तालुक्यांतील आमगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आली.

दोन्ही तालुक्यांतील या आरोग्य केंद्राअंतर्गत गर्भवती आणि स्तनदा माता, तसेच अंगणवाडीतील सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना प्राथमिक तपासणी करून त्यानंतरच्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या जोखमीच्या माता आणि बालकांना प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी आणि रोग निदान करून आवश्यकतेनुसार त्यांचा पुढील उपचार शासकीय माध्यमातून किंवा सामाजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यात येणार आहेत. यासाठी फोक्सि (फेडरेशन ऑफ ऑपस्ट्रेटिक अ‍ॅण्ड गायनोकॉलॉजी सोसायटी) व आयएपी (इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिशियन) या तज्ज्ञांच्या संस्थांमार्फत स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ उपलब्ध करण्यात आले. त्याच प्रमाणे सामंजस्य कारारप्रमाणे डीएचएफएल आणि आरोहण या संस्थांनी या शिबिरात सामाजिक उत्तरदायित्व म्हणून योगदान दिले.

आरोग्य सेवांशी निगडित असलेला हा उपक्रम आता प्रायोगिक तत्त्वावर असला तरी पुढे जाऊन याची व्याप्ती वाढणार आहे तसेच जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांतर्गत प्रथम महिलाआणि बालके याची तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर विविध आजारावर वर्गीकरणानुसार तसे तज्ज्ञ उपलब्ध करून घेऊन त्याचा लाभ जिल्हावासीयांना घेता येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद चव्हाण यांनी म्हटले आहे. जिल्ह्य़ाला आवश्यक विकासाच्या दृष्टीने अभ्यास करून त्यासाठी निश्चित काम करण्यासाठी जिल्ह्य़ाच्या  विकासाचा कार्यक्रम बनवून जेथे जास्त गरज आहे, त्यावर लक्ष केंद्रित करणे. एकात्मिक विकास, आरोग्य, कौशल्य, शिक्षण, आहार आणि जीवनमान हा सहासूत्री कार्यक्रम आखण्यात आला आहे. यास ‘डायलॉग पालघर’ या नावाने मूर्त रूप देण्यात आले आहे. यासाठी सुमारे ५० कोटींचा रुपयांचा निधी जिल्ह्य़ाच्या विकासासाठी देण्यात येणार आहे.

प्राधान्यक्रम

* गरोदर माता मुली आणि मुले यांचे आरोग्य सुधारणे.

*  जिल्हा परिषद आश्रम शाळा व कस्तुरबा गांधी बालक विद्यालय आदी शाळातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती रोखणे शालाबाह्य मुलांना शाळांच्या प्रवाहात आणणे.

*  अद्ययावत प्रशिक्षण व तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती उत्पादनात वाढ करणे.

*  ग्रामस्थांचे स्थलांतर रोखणे.

*  प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा.

*  जीवनमान उंचावण्यासाठी कौशल्यवृद्धी पुरेसे.

*  पाण्याच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करणे.

जिल्ह्य़ातील माता, बालकांना अशा उपक्रमातून आरोग्य आणि रोगतज्ज्ञ शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या सोयीनुसार व दारात उपलब्ध होत आहेत. तज्ज्ञांसाठी आता जिल्ह्याबाहेर जाण्याची आवश्यकता भासणार  नाही. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर असला तरी तो पुढे जिल्हाभर करणार आहोत.

– दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी