कन्नडिग्गांकडून मराठी नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होऊनही अखेर मराठी भाषिकांनी एकतेची वज्रमूठ कायम राखीत बेळगाव महापालिकेवर भगवा फडकविला. सोमवारी झालेल्या महापौर निवडीत महेश नाईक यांनी बाजी मारली. तर उपमहापौरपदी रेणू मुतकेकर यांची वर्णी लागली. या विजयानंतर मराठी भाषिकांनी बेळगावात जल्लोष साजरा केला.     
बेळगाव महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर सर्वांनाच महापौर-उपमहापौर निवडीचे वेध लागले होते. मात्र ही निवड लांबणीवर पडली होती. १० मार्च रोजी निवड होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचाली गतीमान झाल्या होत्या. अल्पमतात असलेल्या कन्नडिग्गांनी मराठी नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न चालविला होता. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून मते फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यासाठी अर्थपूर्ण हालचालींनाही वेग आला होता. या हालचाली लक्षात घेऊन मराठी भाषिकांनी सावध पवित्रा घेतला. सर्व नगरसेवकांना गेले चार दिवस सहलीवर नेण्यात आले होते. गोवा, आंबोली येथील सहल आटोपून ३२ मराठी भाषिक नगरसेवक सोमवारी बेळगावात दाखल झाले.     
महापौर निवडीसाठी मराठी भाषिकांमध्ये महेश नाईक व दिनेश राऊळ या मामा-भाच्यामध्ये चढाओढ सुरू होती. मात्र महेश नाईक यांचा अर्ज भरण्यात आला. त्यांच्या विरोधात कन्नड व ऊर्दू भाषकांच्या वतीने शांता उप्पार व फईम नायकवाडे यांचे अर्ज होते. प्रत्यक्ष निवडीवेळी शांता उप्पार यांनी माघार घेतली. महेश नाईक यांच्या बाजूने ३१ नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. तर नायकवडे यांच्या बाजूने २६ जणांनी कौल दर्शविला. महापौर निवडी पाठोपाठ उपमहापौर निवडीतही मराठी भाषिकांनी बाजी मारली. रेणू मुतकेकर या ३१ मते घेऊन उपमहापौरपदी विराजमान झाल्या. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शैला जनगोंडा यांना २७ मते मिळाली.