कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस १ नोव्हेंबर बेळगावसह सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. आजच्याच दिवशी बेळगाव, गुलबर्गा, बिदर, भालकी, निपाणी आदी मराठी भाषिक भाग आणि ८१४ गावे कर्नाटकात सामील करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ बेळगावसह सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज काळा दिवस पाळण्यात येत आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणांनी बेळगाव परिसर दणाणून सोडला.

बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनतेला महाराष्ट्रात यायचे आहे. त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनेही केली. पण कर्नाटक सरकारने जुलमीपद्धतीने ही आंदोलनं दडपून टाकली. बेळगावमधील संभाजी महाराज उद्यानातून मूक मोर्चा काढण्यात आला. महिलांबरोबर तरुणांचाही या मोर्चामध्ये समावेश होता. गेल्या ६३ वर्षांपासून १ नोव्हेंबर काळा दिवस पाळण्यात येत आहे.

बेळगावच्या जनतेने कलम ३७० प्रमाणे हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. मुंबईत डिलाई रोड परिसरात राहणाऱ्या बेळगावच्या नागरीकांनी हाताला काळी रिबीन बांधून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला.