News Flash

पहाटेच्या सरकारच्या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन -संजय राऊत

बाळासाहेब ठाकरे यांना तीन वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला...

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीवरून राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. (संग्रहित छायाचित्र।इंडियन एक्स्प्रेस)

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके हे लोकसभा निवडणूक लढवत असून, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या प्रचारार्थ बेळगावमध्ये प्रचार सभा घेतली. या सभेनंतर आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘आज जेव्हा त्यांच्या पाठिंब्याची गरज होती त्यावेळी पण फडणवीस यांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्रातली जनता त्याची नोंद ठेवते आहे,’ असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं. त्याचबरोबर पहाटेच्या शपथविधीबद्दलही भाष्य केलं.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘सीमाभागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देणं महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टीका केल्याने मला वाईट वाटले नाही, मात्र ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वातच विधानसभेत बेळगाव-कारवार यांना पाठिंबा देण्याचे ठराव केलेले आहेत. पाठिंब्याची गरज होती, त्यावेळी त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं बेळगावात येऊन मराठी माणसाला पाठिंबा द्या. आज जेव्हा त्यांच्या पाठिंब्याची गरज होती त्यावेळी पण फडणवीस यांनी वेगळी भूमिका घेतली असेल, तर महाराष्ट्रातली जनता त्याची नोंद ठेवते आहे,’ असं सांगतानाच ‘अजित पवार यांना चांगलं माहिती आहे सरकारला कसा टेकू लावायचा. ज्यावेळी पहाटे सरकार बनलं, दुपारी कोसळलं, त्यानंतर पुन्हा ते बनलं… या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन आहेत,’ असा टोलाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला.

“बेळगाव दौरा हा फक्त दौरा नव्हता. महाराष्ट्र एकीकरण समिती फार महत्त्वाची संघटना आहे. एकीकरण समितीचा उमेदवार शुभम शेळके हा लोकसभा लढवत आहे आणि त्याला पाठिंबा देणं हे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचे कर्तव्य आहे. इथे मतभेद असले तरी चालतील मात्र तिथे असायला नकोत. शिवसेना-काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी प्रत्येक मराठी माणसाने तिथे गेले पाहिजे. तिथे लोकांचा उत्स्फुर्तपणे पाठिंबा मिळतोय. यावेळेस महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार चांगली मुसंडी मारतील,” असा अंदाज राऊत यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब ठाकरे यांना तीन वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला…

“आम्हाला मराठी प्रेमासाठी कोणी ज्ञानामृत पाजण्याची गरज नाही. बेळगावसाठी १९६७ साठी आंदोलन करून शिवसेनेनं ६७ हुतात्मे दिलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांना तीन वर्षाचा तुरुंगवास बेळगावसाठी भोगावा लागला होता. त्या शिवसेनेचे आम्ही पाईक आहोत, त्यामुळे आमचे मराठी प्रेम काय आहे हे आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही, खरं म्हणजे तुमच्या मराठी प्रेमाविषयी या विषयाने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे, मुख्यमंत्री फार सौम्य आहेत अजूनही मला असे वाटते, मुख्यमंत्री माणुसकी दया दाखवत आहेत, लोकांच्या प्रश्नासंदर्भात ते अस्वस्थ आहेत, पण लोकांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे,” असं आवाहनही राऊत यांनी यावेळी महाराष्ट्रातील जनतेला केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 11:44 am

Web Title: belgaum lok sabha bypoll prestige battle for bjp sanjay raut maharashtra ekikaran samiti candidate devendra fadanvis bmh 90
Next Stories
1 माझी मागणी मान्य केल्याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार – राज ठाकरे
2 “बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचं हित माहितीये, आम्ही…”; पंकजा मुंडेंचा धनंजय मुडेंवर निशाणा
3 पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची सांगता
Just Now!
X