बुवाबाजी करणा-यांकडून केवळ श्रद्धाळू लोकांपुढेच चमत्कार केले जातात. विज्ञानाच्या कसोटीवर आव्हान देणा-या कार्यकर्त्यांपुढे बुवाबाजी करणारे नांगी टाकतात. त्यामुळे लोकांनी श्रद्धा जरूर बाळगावी मात्र ती डोळस असावी, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकत्रे श्याम मानव यांनी व्यक्त केले. मिरज विद्यार्थी संघाच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांचे भाषण झाले. त्यांच्या व्याख्यानमाला सनातनी संघटनांनी उधळून लावण्याचा इशारा दिल्यामुळे पोलीस बंदोबस्तात त्यांचे भाषण झाले.
या वेळी मानव म्हणाले, की आमच्या संघटनेचा कोणत्याही धर्माला विरोध नाही, मात्र धर्माच्या नावाखाली चालणारी फसवणूक आणि अघोरी प्रथा बंद झाली पाहिजे. यासाठी ही चळवळ सुरू आहे. बुवाबाजी करणा-या थोतांड व्यक्ती लोकांच्या श्रद्धेचा गरफायदा घेतात. भूतबाधेमुळे हत्या, अंधश्रद्धेतून नरबळी असे प्रकार टाळण्यासाठी चळवळीचे प्रयत्न कमी पडू लागल्याने कायद्याची आग्रही मागणी करण्यात आली. शासनानेही जादूटोणाविरोधी कायदा करून चळवळीच्या भूमिकेस पाठिंबा दर्शवला. आता असे प्रकार रोखण्यासाठी कायद्याचे पाठबळ मिळाले आहे.
वारकरी संप्रदायातील संत व छत्रपती शिवरायांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. लोकजागृतीसाठी संत वाङ्मयाचे साहित्य महत्त्वाची भूमिका बजावू शकते. कोणत्याही चमत्काराने अस्तित्वात नसलेल्या गोष्टी उत्पन्न होऊ शकत नाहीत. हे त्यांनी प्रात्यक्षिकासह दाखवून दिले. हवेत हात फिरवून सोन्याची अंगठी व सोनसाखळी त्यांनी काढून दाखवली. मिरज विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद पाठक यांनी स्वागत, तर मकरंद देशपांडे यांनी आभार मानले.