News Flash

बेंदूरनिमित्त बैलांपुढे लावण्यांचा फड!

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बेंदूर या सणाला मोठे महत्त्व आहे.

गोंदवले खुर्दमधील बेंदूर सणावेळी बैलजोडीच्या पुढय़ात सुरू असलेला लावणी नृत्याचा कार्यक्रम.

दुष्काळ, कर्जबाजारीपण आणि आत्महत्या यांनी महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी गांजलेला असताना सातारा जिल्ह्य़ातील दुष्काळी माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथे एका शेतक ऱ्याने बैलपोळय़ाच्या वेळी ‘सर्जा – राजा’च्या पुढय़ात चक्क ‘डीजे’च्या भिंती लावत नर्तकींचा जाहीर कार्यक्रम ठेवला. शेती आणि शेतकरी सर्वत्र अडचणीतून जात असताना या उधळपट्टीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बेंदूर या सणाला मोठे महत्त्व आहे. वर्षभर त्याला मदत करणाऱ्या त्याच्या लाडक्या ‘सर्जा-राजा’चे कौतुक या दिवशी केले जाते. या सणासाठी बैलांना अंघोळ घालत, सजवले जाते. गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते. गोड-धोड खावू घालून त्यांना एक दिवसाची विश्रांती दिली जाते. पण या पारंपरिक पद्धतीला छेद देत गेल्या काही वर्षांपासून बैलपोळय़ाच्या या उत्सवातही शक्तिप्रदर्शनाची लाट उसळली आहे. मोठय़ा मिरवणुका, डॉल्बीचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारभावाचा अभाव यामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या शेती व्यवसायातील कुटुंबांच्या या उधळपट्टीवर अनेकदा टीका होताना दिसत होती. गोंदवल्यातील या लावणी नृत्याने यात आणखी भर घातली आहे.

गोंदवले खुर्द येथील या शेतक ऱ्याने यंदाच्या बेंदूर सणावेळी त्याच्याकडील ‘सर्जा-राजा’ला सजवून त्यांची मिरवणूक तर काढलीच, पण गावातील एका चौकात त्यांच्यासाठी खास लावणी नृत्याचा कार्यक्रमही ठेवला. त्यासाठी खास व्यासपीठ उभारण्यात आले होते. ‘डीजे’ची व्यवस्था केली. मग या साऱ्यांच्या मदतीने त्या बैलांच्या पुढय़ात  लावणी आणि नृत्याचा कार्यक्रम घडला. याचा लाभ घेण्यासाठी पुन्हा पंचक्रोशीतील जनता उपस्थित होती.

गोंदवल्यात झालेल्या या ‘बेंदरा’ची सध्या परिसरात सर्वत्र चर्चा सुरू आहे. सणांचे होत असलेले हे बाजारूपण आणि त्यातून घडणारी उधळपट्टी, शक्तिप्रदर्शन याबद्दल अनेक जण चिंता व्यक्त करत आहेत. एकीकडे समस्यांनी गांजलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग पकडत असताना दुसरीकडे या अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्याची मागणीही होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 2:53 am

Web Title: bendur festival in maharashtra
Next Stories
1 पंढरपुरमध्ये महास्वच्छता अभियानात ६० टन कचरा गोळा
2 पश्चिम विदर्भातील पशुपालन संस्थांची वाताहत
3 अजित पवारांचे पाय सोलापूरकडे वळेनात..
Just Now!
X