दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणात तपासाच्या व्याप्ती वाढली आहे. या प्रकरणात किडनी खरेदी करून प्रत्यारोपण करणारे लाभार्थी व अनेक शहरातील डॉक्टर्स अडकणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी नागपूर, औरंगाबाद, सांगलीसह आता मुंबई, पुण्यातील अनेक प्रतिष्ठितांशी धागेदोरे जुळलेले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने तीन दिवसांची वाढ केली आहे.
अकोल्यासह राज्यभर गाजत असलेल्या किडनी तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शिवाजी कोळी, बुलडाणा जिल्ह्य़ातील विनोद पवार, अकोल्यातील आनंद जाधव व देवेंद शिरसाट हे चार आरोपी पोलीस कोठडीत असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. आनंद जाधव व देवेंद्र शिरसाट यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पासपोर्ट व इतर माहिती आरोपींकडून घ्यायची असल्याने पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने दोघांच्या पोलीस कोठडीत ११ डिसेंबपर्यंत वाढ केली आहे. शिवाजी कोळीला अटक केल्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरली आहेत. कोळी हा या रॅकेटमधील प्रमुख आरोपी असून, त्याने टाकलेले जाळे कुठपर्यंत पसरलेले आहे आदी माहिती समोर येत आहे.
श्रीलंकेत दोघांच्या, तर औरंगाबादेत तिघांच्या किडनी काढण्यात आल्या. औरंगाबाद येथील एका मोठय़ा रुग्णालयात काढण्यात आलेल्या किडनी प्रकरणात डॉक्टरांकडून कायद्यानुसार पूर्तता करण्यात आली आहे का, याची खातरजमा पोलीस करीत आहेत. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीने प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली असून, त्यानंतर ती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आपला अहवाल सादर करणार आहे. त्यावरून डॉक्टरांनी गुन्हा केला आहे का, हे ठरवून पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आतापर्यंत पाच पीडित समोर आले आहेत. अनेक पीडित समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. राज्यातील या प्रकरणात अनेक लाभार्थी असल्याची माहिती आहे. तेही यात अडकणार असून, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राज्यातील औरंगाबाद, नागपूर, सांगली, मुंबई, पुणे व इतर शहरातील काही मोठे डॉक्टरही पोलिसांच्या रडारवर आहेत.

तपास प्रगतीपथावर -मीणा
या प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर आहे. मुख्य सूत्रधारासह चौघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलीस कोठडीत अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, समितीचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांच्या सहभागाविषयी अधिक स्पष्टता येईल. लाभार्थीही या प्रकरणात आरोपी असणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी दिली.