मलकापूर नगरपंचायतीच्या २४ तास नळपाणी योजनेच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या नळपाणी पुरवठा योजनांना पाणी मीटरसाठी राज्य शासनातर्फे ५० टक्के अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १९ नळपाणीपुरवठा योजनांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले, की मलकापूर २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीबचत, वीजबचत व पर्यावरण संवर्धनाचे मोलाचे कार्य साधले गेले आहे. हा यशस्वी पथदर्शी मलकापूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक गावांत या योजनेचा विचार केला जात आहे. काही गावांत ही योजना पूर्ण, तर काही ठिकाणी ती प्रगतिपथावर आहे. अनेक ग्रामपंचायती या योजनेचा प्रस्ताव करीत आहेत. सदर २४ तास नळपाणीपुरवठा योजनेसाठी पाणीमीटर अत्यावशक असून, शासनाने अद्यापही मीटरसाठी धोरण निश्चित केले नसल्याने हा खर्च ग्राहकांना अनिवार्य होता. सदर योजनेसाठी १० टक्के लोकवर्गणी भरावी लागत असल्याने नळपाणीपुरवठा जोडणी व मीटरसाठी खर्च करणे ग्रामपंचायतींना व ग्रामस्थांना जिकिरीचे झाले आहे. यावर जिल्ह्यात १९ ठिकाणी प्रस्तावित असलेल्या २४ तास नळपाणीपुरवठा योजनांना आवश्यक असणा-या ३१ हजार ५०० मीटरसाठी ३२ कोटी ३६ लाख रुपये खर्च येणार होता. शासनाकडून यासाठी ५० टक्के रकमेची म्हणजेच १६ कोटी १८ लाख रुपयांची तरतूद अपेक्षित आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम संबंधित लाभार्थीना विविध बक्षिसांच्या रकमेतून उपलब्ध होणार आहे. सध्या कराड व पाटण तालुक्यांत १२ ग्रामपंचायतींनी २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. त्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कुंभारगाव असून, सातारा तालुक्यातील शिवथर व कण्हेरखेड या प्रतिष्ठित गावांचा समावेश आहे.