सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी दिलेला पदाचा राजीनामा प्रदेश पक्षश्रेष्ठींनी नामंजूर केला असला तरी भोसले हे राजीनाम्यावर ठाम असून त्यांनी पदभारही सोडला आहे. दरम्यान, आता माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर अॅड. यू. एन. बेरिया व माजी नगरसेवक प्रकाश वाले यांची नावे शहराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
तथापि, यलगुलवार यांनी अध्यक्षपदासाठी आपण इच्छूक नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी आपण शहराध्यक्षपदावर काम केले असून आता पुन्हा या पदावर काम करण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले. धर्मा भोसले यांचा राजीनामा अद्यापि मंजूर झाला नाही. त्याबाबतही विचार होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. अॅड. बेरिया हे पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी यापूर्वी महापौरपदाबरोबर पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुरा वाहिली होती. २००४ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. त्या पाश्र्वभूमीवर अॅड. बेरिया यांना शहराध्यक्षपद सोडावे लागले होते. आता धर्मा भोसले यांनी कोणत्याही स्थितीत हे पद सांभाळणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे या पदाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी दिली तर ती आपण प्रामाणिकपणे पार पाडू. आपल्या अनुभवाचा आगामी विधानसभा निवडणुकीच्यावेळी निश्चित फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शहराध्यक्षपदासाठी प्रकाश वाले हे इच्छूक आहेत. वीरशैव लिंगायत समाजाचे वाले हे सुशीलकुमार शिंदे यांचे विश्वासू समजले जातात.