बेटी बचाओ, बेटी पढाओ नाही भाजपा वालो से बेटी बचाओ असे म्हणायची वेळ आता देशावर आली आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुलींबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपावर निशाणा साधला. पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान, जाहीर सभेत ते बोलत होते.

चव्हाण म्हणाले, एकीकडे भाजपाकडून बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा दिला जातो. तर दूसरीकडे मुली पळवून आणण्याची भाषा करीत भाजपाचे आमदार राम कदम अकलेचे तारे तोडत आहेत. आमदार कदम हे महाराष्ट्राला कलंक आहेत. मुलींना उचलून घेऊन जाण्यासाठी आमदार झालात का? अशी वर्तणूक करायला लाज वाटत नाही का? अशा शब्दांत ते कदमांवर बरसले.

राज्यात एवढं मोठ प्रकरण सुरु असताना मुख्यमंत्र्यांच्या तोंडून एक शब्दही निघत नाही, भाजपा नेते बोलत नाहीत. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत. अद्याप काहीही करायचं नाही असा आदेशच पोलिसांना आला आहे. त्यामुळे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ नाही तर ‘भाजपा वालो से बेटी बचाओ’ असे म्हणायची वेळ देशावर आली आहे. हे सहनशीलतेच्या पलीकडे चालेल आहे. ही मंडळी अशीच राहिली तर मुलींना आणि महिलांना रस्त्यावर चालणं शक्य होणार नाही. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. चार वर्षांपूर्वी सत्ता मिळालेल्या मंडळींनी बेभान होऊन वाटेल ते बोलत आहेत आणि जनता सहन करत आहे, असे चव्हाण म्हणाले.

पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण भाजपाला अवगत झालं आहे. त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यातील निवडणुका जिंकल्या. आगामी काळात हीच पद्धत आंगिकारून आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ शकतो, अशी म्हणणारी ही मस्तवाल मंडळी आहेत. गेल्या चार वर्षात घोषणा झाल्या, त्यांच्या पेपरमध्ये जाहिराती देखील दिल्या. मात्र, त्या ९९ टक्के बोगस निघाल्या असून जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजपाने केले आहे. भाजपाकडे घोषणांचा मोठा कारखाना आहे. केवळ घोषणा सुरू आहेत. प्रत्येक्ष कृतीतून काहीही होत नाही असे चव्हाण म्हणाले.