‘बेटी बचाव बेटी पढाओ’चा नारा योजनेचा ग्राहक नोंदणी फॉर्म भरण्यासाठी जिल्हाभरातील टपाल कार्यालयात नागरिकांची झुंबड उडाली आहे. या योजनेतून दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे, असे सांगून सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्यात येत आहे. मात्र, अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचा खुलासा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

बेटी बचाओ-बेटी पढमओ चा नारा देणाऱ्या या योजनेचा ग्राहक नोंदणी फॉर्म भरण्यासाठी जिल्हय़ातील टपाल कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. शहरात बेटी बचाओ-बेटी पढमओ या योजनेच्या नावावर शेकडो ‘बोगस फॉर्म’ची विक्री होत आहे. या योजनेतून दोन लाख रुपये थेट अनुदान मिळणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु केंद्र सरकारची अशी योजना नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले.

परंतु ग्रामीण भागात या योजनेअंतर्गत विद्याíथनीसाठी दोन लाख रुपयांचा थेट लाभ मिळणार असल्याची बातमी पसरताच विविध भागातून विद्यार्थिनी व महिलांनी पोस्टासमोर फॉर्म पाठवण्यासाठी  गर्दी केली असून प्रत्येक जण आपला फॉर्म भरण्यासाठी धडपडत आहे.

जिल्हाभरातील बऱ्याच झेरॉक्स सेंटरवर फॉर्म विक्री होत असून त्यासाठी लागणारे इतर कागदपत्रही  झेरॉक्स करून देण्यात येत आहेत. हा फॉर्म टपाल करण्यापर्यंत एका व्यक्तीला जवळपास शंभर रुपयांचा भरुदड सोसावा लागत आहे. या फॉर्ममध्ये विविध माहिती मागण्यात आलेली असून त्यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती तसेच बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी माहिती मागविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुलीला २ लाख रुपये मिळणार असल्याचाही उल्लेख केलेला आहे. फॉर्मसोबत असलेल्या पाकिटावर भारत सरकार, महिला एवं बालविकास मंत्रालय, शांतिभवन, नवी दिल्ली असा पत्ता छापण्यात आलेला आहे.

भारत सरकार सर्वसामान्यांसाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना राबवत असून योजनेंच्या माहितीअभावी सर्वसामान्यांची लूट कशी होते, याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ बेटी पढाओ योजना’ या योजनेच्या नावावर सर्वसामान्य जनतेची होणारी लूट प्रशासनाने योग्य चौकशी करून तत्काळ थांबवावी. योजनेची योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

सूचना नाही

  • ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’च्या फॅार्मबाबत राज्य शासनामार्फत कसल्याच प्रकारच्या सूचना आल्या नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी दिली.