आयपीएल २०-२० क्रिकेट स्पर्धेसाठी सट्टेबाजी करणाऱ्या ५ उच्चभ्रू व्यापारी व मुख्य सट्टेबाजास औरंगाबाद गुन्हे शाखेने अटक केली. या टोळीकडून १९० हँडसेट, ६ लाख ४ हजार ८९० रुपये व ४ महागडय़ा चारचाकी गाडय़ा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. नरेश धर्माजी पोतलवाड (वय ३५) या आरोपीच्या घरातून सट्टेबाजीसाठी केल्या जाणाऱ्या मोबाइल कनेक्शनचे जाळेच पोलिसांना आढळून आले. गेले १५ दिवस पाळत ठेवून गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. मराठवाडय़ातील प्रमुख शहरांसह दिल्लीपर्यंत सट्टेबाजांची साखळी असून, यात एखादा नामांकित क्रिकेटमधील खेळाडूही सहभागी आहे का, याची तपासणी पोलीस करीत आहेत.
औरंगाबाद शहराचे आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर अमितेशकुमार यांनी शहरातील वाहतुकीच्या प्रश्नांसह विविध गुन्हय़ांतील आरोपींना पकडण्याचे सत्र सुरू केले. गेल्या तीन दिवसांपासून सट्टेबाजांच्या टोळीवर पोलिसांचे बारीक लक्ष होते. शहराच्या उस्मानपुरा भागात रामगोविंद अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक पाचमध्ये नरेश धर्माजी पोतलवाड हा सट्टेबाज २८ बुकींच्या मदतीने ‘व्यवहार’ करीत असे. कोणत्या भागातून कोणाला किती सट्टा लावायचा आहे आणि दिल्लीमधून त्या सट्टय़ासाठी काय दर आहे, या माहितीची देवाणघेवाण तो करीत असल्याचा दावा पोलिसांनी केला. सट्टेबाजीच्या खेळात ५ बडे व्यापारीही सहभागी झाले होते. विनय नवीनचंद्र जैन (वय ४९, एन ५, सिडको) याची प्लॅस्टिक दाणे बनविण्याची कंपनी आहे. त्याच्याच कंपनीत प्रफुल्ल राठी काम करतो. तोही सट्टेबाजीतला आरोपी आहे. मार्बलचा व्यापारी ललित हस्तिमल कोठारी (वय ४९, सिडको, टाऊन सेंटर), बांधकाम व्यावसायिक अनिल पोपटलाल मुनोत (वय ५०, हर्षल कॉम्प्लेक्स, जिजामाता कॉलनी, पैठण गेट), पीओपीचे आलोक अशोक अग्रवाल (वय ३०, एन ८, सिडको) यांना रात्री साडेआठ ते साडेबारादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील काही नागरिकांच्या नावाने खोटय़ा व बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्ड घेऊन मोबाइल संपर्काद्वारे ते सट्टा लावत होते. साधारण दीड वर्षांपासून अशी सट्टेबाजी सुरू असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. गुरुवारी रात्री कोलकाता नाइट रायडर्स व मुंबई इंडियन्सदरम्यान सुरू असणाऱ्या सामन्यावर विजय-पराजय, चौकार-षटकार, एकूण धावा व बाद खेळाडू यावर बोली लावून ते सट्टा खेळण्यास भाग पाडत होते. अन्य व्यक्तींच्या नावे सीमकार्ड असूनही फसवणूक करून नियोजनबद्ध पद्धतीने शहरातून सट्टेबाजी होत होती, असा दावा पोलिसांनी केला.
या टोळीचे धागेदोरे मुंबई, दिल्लीपर्यंत असल्याने अधिक तपास केला जात असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. एका मोबाइलवरून बुकीला जोडून देण्यासाठी नरेश पोतलवाड याला प्रत्येकी ४ हजार रुपये मिळत होते, असे तपासादरम्यान दिसून आले. पोतलवाडला पोलिसांनी त्याच्या आलिशान गाडीतून पकडले. त्याच्या गाडीत ३ लाख १३ हजार रुपये सापडले. यातील काही व्यापाऱ्यांकडे फोर्ड कंपनीच्या आलिशान मोटारी आहेत. पकडलेल्या चार गाडय़ांपैकी एक गाडी अक्षरश: कोरी करकरीत आहे. उस्मानपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गौतम पातारे, कृष्णा शिंदे, राहुल खटावकर, पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे व गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.