ग्रामीण भागातील प्रत्येक गावात बेटी बचाव बेटी पढाओसारख्या योजना रुजविण्यासाठी गावविकासाला प्राधान्य देऊन विकास साधला जाईल, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
जिल्हा परिषदेत बेटी बचाव बेटी पढाओ या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुंडे बोलत होत्या. आईच्या गर्भात मुलगी आहे का हे कळले पाहिजे. पण कायद्याने त्यास बंदी असल्याने त्यास विरोध आहे. तथापि गर्भात मुलगी असेल, तर त्या आईची प्रसूती शेवटपर्यंत तपासली जावी, जेणेकरून मुलगी वाचली की नाही, ते स्पष्ट होईल असा आग्रह आपण पंतप्रधानांकडे धरला असल्याचे मुंडे यांनी सांगितले. बेटी बचाव बेटी पढाओ कार्यक्रमाची सुरुवात आपण बीड जिल्ह्य़ाच्या अतिदुर्गम शिरूर गावातून केली. हा कार्यक्रम राज्यभर जोमात चालू राहील. प्रत्येक आईने मुलीच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, वैद्यकीय अधिकारी जयश्री कुलकर्णी यांनी पीसीपीएनटी कायद्यांतर्गत जिल्ह्य़ात झालेल्या कामांचा आढावा सादर केला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. बेदमुथा यांनी प्रास्ताविकात जिल्ह्य़ाचे लिंगप्रमाण दरहजारी ९१४ असल्याचे सांगितले.
२५० ग्रामपंचायती आयएसओ
औरंगाबाद जिल्ह्य़ातील २५० ग्रामपंचायती आयएसओ झाल्याची माहिती या वेळी देण्यात आली. जि. प. च्या पंचायत विभागात दर आठवडय़ाला एका ग्रामपंचायतीचा आढावा फलक सचित्र लावण्यात येणार आहे. या वेळी सिल्लोड तालुक्यातील मोढा गावच्या आढावा फलकाचे उद्घाटन मुंडे यांनी केले. संपूर्ण वर्षभर प्रत्येक ग्रामपंचायतीची माहिती या फलकावर डकविण्यात येणार आहे. जि. प. चे उपाध्यक्ष दिनकर पवार, सभापती संतोष जाधव, सरला चव्हाण, विनोद तांबे आदी उपस्थित होते.