महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून शासन अंगणवाडय़ांचा विकास होण्यासाठी पावले उचलत असले तरी त्यात लोकसहभाग अधिक महत्त्वाचा ठरतो. सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुक्यात लोकसहभागामुळे भागाईवाडी व पाथरीसारख्या छोट्याशा गावांमधील अंगणवाडी प्रथमच आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकनासाठी सज्ज झाली आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून अंगणवाडीसाठी अद्ययावत इमारती, बालकांना पूरक पोषण आहार, गावातील किशोरवयीन मुली व गरोदर मातांच्या आरोग्यासाठी सुविधा मिळत असल्या तरी यात गावपातळीवरील लोकसहभाग महत्त्वाचा मानला जातो. भागाईवाडीच्या अंगणवाडीमधील रंगरंगोटीसह अंतर्गत सजावट, दूरचित्रवाणी, सीडी प्लेअर, पाणी फिल्टर, डायिनग टेबल, खुच्र्या, खेळाचे मदान आणि तेथे वृक्ष लागवड तथा संगोपन आदी बाबी लोकसहभागातून पाहावयास मिळतात. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी पालकांनीच घेतली असून त्याचे चांगले दृश्य परिणाम दिसून येतात.
अंगणवाडीतील मुला-मुलींची शंभर टक्के उपस्थिती, गणवेश, टाय, बूट, ओळखपत्र अशी खासियत येथे पाहावयास मिळते. अंगणवाडीतील िभती पुरेशा बोलक्या आहेत. िभतीवर विविध पक्षी, प्राणी, रंग, फुले, फळे यांची मराठी व इंग्रजी भाषेतून दिलेली माहिती आणि मुलामुलींना त्याचे होणारे आकलन उल्लेखनीय आहे. ‘आठवडय़ातून एक दिवस इंग्रजीचा’ या उपक्रमातून मुलांना इंग्रजीची गोडी लागली आहे. सेविका कविता घोडके-पाटील यांच्या उपक्रमशीलतेची प्रशंसा करीत, भागाईवाडीची अंगणवाडी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन (आयएसओ गुणांकन प्रमाणपत्र) घेण्यासाठी आता सज्ज झाल्याचे बालविकास अधिकारी एस. एस. बुलबुले सांगतात.
सोलापूरपासून ४२ किलोमीटर अंतरावर आणि अवघ्या ७०० लोकसंख्येच्या चिमुकल्या भागाईवाडीतील हे शैक्षणिक उपक्रम आणि त्यातील लोकसहभाग पाहता हा आदर्श ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ ग्रामस्थ लहू घोडके यांनी व्यक्त केला. याच अंगणवाडीत शिकलेली अश्विनी पाटील ही सध्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम शिकत आहे. या वाटचालीत अंगणवाडीची शिदोरी जीवनाला आकार देणारी ठरेल, असा अश्विनीला विश्वास वाटतो. मानधन किती आणि कधी, यापेक्षा मुलांच्या भवितव्याच्यादृष्टीने दर्जेदार शिक्षणाबरोबर गावातील सौहार्दाचे वातावरण टिकविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे अंगणवाडी सेविका कविता घोडके-पाटील यांनी नमूद केले.