वाडा : तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी लोकवस्ती असलेल्या आखाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील भगतपाडा या गावाचा पावसाळ्यातील चार महिने सर्वाशी संपर्क तुटतो. संपर्क करायचा झाल्यास त्यांना जीव धोक्यात घालून नदीतून प्रवास करावा लागतो.

वाडा या तालुक्याच्या ठिकाणापासुन ४० किलोमीटर लांब अंतरावर व अतिदुर्गम भागातील भगतपाडा हे दोनशेहून अधिक लोकवस्ती असलेले छोटेसे गांव आहे. येथे ना प्राथमिक शिक्षणाची सोय, ना आरोग्याची सोय. आखाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील भगतपाडा हे गाव पिंजाळी नदीपलीकडील असल्याने पावसाळ्यात पिंजाळी नदीला येणाऱ्या पुरामुळे हा गांव किमान चार महिने संपर्कहीन होतो.

आखाडा येथील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन ही भगतपाडा येथे असल्याने या शेतीत भात लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते. भगतपाडा येथील विद्यार्थी तसेच स्वस्त धान्य दुकानावर जाणाऱ्या ग्रामस्थांनादेखील नदी पार करताना जीव धोक्यात घालावा लागतो.

भगतपाडा येथे जाण्यासाठी येथील नदीवर पूल बांधणे गरजेचे आहे. मात्र या परिसरात मुंबई महानगरपालिका मोठा पिंजाळ प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पात आखाडा-वडवली परिसरातील बहुतांशी गांवे विस्थापित होणार आहेत. त्यामुळे या भागात शासन विकास कामांसाठी अधिक अग्रेसर दिसत नाही. दरम्यान तोपर्यंत येथील ग्रामस्थांना वाहत्या नदीतून प्रवास करावा लागणार आहे.

पावसाळ्यात कुणी गंभीर आजारी पडला तर त्याला डोली करून नदीपात्रातून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागते.

– संतोष बुधर, ग्रामस्थ, भगतपाडा