परभणीत शिवसेनेचे संजय जाधव यांनी तब्बल १ लाख २७ हजार मताधिक्याने सेनेचा बालेकिल्ला राखला. जाधव यांना ५ लाख ७८ हजार ४५५, तर राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांना ४ लाख ५२ हजार ३०० मते मिळाली.
भांबळे यांना पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीने तब्बल अर्धा डझन नेत्यांना नोटिस दिल्या, त्यावरूनच विरोधकांनी राष्ट्रवादीला आपल्या पराभवाचा अंदाज आल्याचे गणित लावले हाते. शिवसेनेचे आ. संजय जाधव आणि श्री. भांबळे यांच्यात निवडणुकीच्या टप्यात जी चुरशीची लढत वाटत होती, ती आ. जाधव यांनी एकतर्फीच करून दाखवली.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ५५ हजारांचे मताधिक्य विजयात निर्णायक ठरले, तर भांबळेंच्या जिंतूर मतदारसंघातच त्यांना मोठा फटका बसला. जिंतूर मतदारसंघातही सेनेने साडेपाचशे मतांचे अधिक्य मिळवले. मंत्री राजेश टोपे यांच्या घनसावंगीतही भांबळे यांना मताधिक्य मिळू शकले नाही. हमखास मताधिक्याची अपेक्षा बाळगलेल्या मतदारसंघांतच राष्ट्रवादीच्या पदरी साफ अपयश पडले. दुसरीकडे परभणी विधानसभा वगळता अन्य पाचही मतदारसंघांमध्ये सेनेला मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे जाधव यांचा दिल्लीचा मार्ग सुकर झाला. शिवसेनेने १९८९ पासून लढवलेल्या आजवरच्या निवडणुकांत जाधव यांना विक्रमी मतदान झाले. सेनेच्या आजवरच्या सर्व खासदारांचे विक्रम मोडीत काढत स्वतचा विक्रम प्रस्थापित केला. गेल्या निवडणुकीतील सेना उमेदवार गणेश दुधगावकरांपेक्षा दुप्पट मताधिक्य घेत जाधव यांनी विजय साजरा केला.
आता तरी बाहेरचा कोण ते ठरवा – जाधव
या निवडणुकीत विरोधकांनी आपल्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका केली. जातीबद्दल आरोप केले, बाहेरचा म्हणून हिणवले. हे आरोप जनतेने खोटे ठरवले. आता तरी बाहेरचा कोण ते ठरवा, अशी प्रतिक्रिया खासदार जाधव यांनी विजयानंतर दिली. सेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणारा हा जिल्हा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी या जिल्ह्यात रुजवलेले सेनेचे बीज राष्ट्रवादीला कदापि काढून टाकता येणार नाही. निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप विसरून जनतेच्या प्रश्नांवर झगडत राहू, असेही ते म्हणाले.
मोदी लाट होतीच – भांबळे
नरेंद्र मोदी यांची लाट देशभरच होती. या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांसह आपला पराभवसुद्धा मोदी लाटेनेच झाला. जे निवडणुका हरले ते किमान एक लाखाहून अधिक मतांनी हरले आहेत. जनसामान्यांमध्ये ही लाट होतीच. मतदानातून या लाटेचा प्रभाव जनतेने दाखवून दिल्याची प्रतिक्रिया भांबळे यांनी व्यक्त केली.