सोशल मीडियावरुन ट्रोल होणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही. कलाकार, राजकीय नेते, पत्रकार ते सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाला कधी ना कधी तरी थोड्याफार प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावंच लागतं. पण आज नंबर लागला आहे काँग्रेस नेते भाई जगताप. भाई जगताप यांनी नरेंद्र मोदी यांचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे आणि ही पोस्टच त्यांच्या ट्रोलिंगचं कारण ठऱत आहे. काय आहे ती पोस्ट? जाणून घेऊया.

सध्या सगळीकडेच ऑलिम्पिकचं वारं वाहत आहे. याच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा एक खेळाडू टोक्योला पाठवलाच गेला नाही. त्यामुळे आपण सुवर्णपदकाची संधी गमावली, अशी पोस्ट केली आहे. मात्र, ट्रोलिंगचं कारण असं की त्यांनी या पोस्टसोबत नरेंद्र मोदींचा फोटो शेअर केला आहे.

अशी आहे भाई जगताप यांची पोस्ट…


आपल्या फेसबुकमध्ये भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो शेअर केला आहे. यात ते म्हणतात, “लांब फेकण्याचा सर्वोत्तम अनुभव असलेला देशाचा खेळाडू टोक्योला पाठवला गेला नाही. भारताने सुवर्णपदकाची संधी गमावली”.

त्यांच्या याच पोस्टवरुन ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल होऊ लागले आहेत. नरेंद्र मोदी समर्थकांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे. तर काही जणांनी काँग्रेसच्या बैलगाडी आंदोलनावेळचा बैलगाडीवरुन खाली पडल्याचा व्हिडिओ शेअर करत त्यांना ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी काँग्रेसचा निषेधही केला असून काँग्रेसच्या सत्तेच्या काळाची आठवणही भाई जगताप यांना करुन दिली आहे.