मराठा क्रांती मोर्चा आयोजकांवर दबाव आणल्याचा आरोप फेटाळत आपण आयोजकांना त्रास दिलेला नाही असा खुलासा भय्यू महाराज यांनी केला आहे. आम्ही कायदा जपणारे आहोत, तोडणारे नाही. त्यामुळे आम्हाला जाब विचारायचाच असेल तर समोर येऊन विचारावे असे त्यांनी आयोजकांना सुनावले. माध्यमांशी बोलताना भय्यू महाराज यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढले.
भय्यू महाराज व समर्थकांनी फोनवरून धमकी देत कायदेशीर नोटीस आणि आयोजकांच्या संपत्तीबाबत माहिती अधिकाराचा वापर सुरू केला आहे. यातून मराठा क्रांती मोर्चा आयोजकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यात खोटे गुन्हे, जीवघेणा हल्ला किंवा जीवितास धोका संभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रांती मोर्चा संयोजकांना संरक्षण देऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर भय्यू महाराज यांनी आपली भूमिका मांडली.
भय्यू महाराज यांनी या वेळी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. आम्ही गुन्हेगारांचे कधीच समर्थन करत नाही. उलट गुन्हेगारांनाच मंदिराचे पुजारी बनवण्यात आले आहे. आम्ही गुन्हेगारांना समर्थक बनवले नाही असा टोलाही लगावला. आम्ही कायद्यासोबत आहोत असेही त्यांनी या वेळी म्हटले.
भय्यू महाराजांनी वृत्तवाहिन्यांद्वारे घेतलेली भूमिका कोणालाही मान्य नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांच्या भूमिकेचा निषेध केला. या गोष्टीमुळे भय्यू महाराज यांनी त्यांच्या भक्त अथवा समर्थकांमार्फत आपल्यासह ८-९ जणांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले आहे. आपण चुकीचे बोललो नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या नोटिशीला मात्र कायदेशीर उत्तर देऊ, असे प्रकाश जगताप यांनी सांगितले. मुंबई येथील असद पटेल व तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील आनंद माणिक चिनगुंडे या दोन भय्यू महाराज समर्थकांनी उस्मानाबाद पालिकेत आपल्या ‘हॉटेल रोमा’च्या जागेबाबत व बांधकाम परवान्याबाबत माहिती अधिकार टाकून त्रास देण्याचे उद्योग सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला होता.