भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केली नाही तर त्यांची हत्याच झाली असावी असा संशय केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशीही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. भय्यूजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची आत्महत्या केली की हत्या याबाबत चर्चा सुरु होती. सुरुवातीला त्यांनी आत्महत्याच केली अशी माहिती समोर आली होती. भय्यूजी महाराज हे आत्महत्या करणं शक्य नाही असं त्यांच्या अनेक निकटवर्तीयांनी मला सांगितलं. त्याचमुळे या प्रकरणात काही काळंबेरं असेल तर ते शोधून काढावं यासाठीच मी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तसेच ही आत्महत्या नसून हत्याच आहे असेच मलाही वाटते आहे असेही आठवले यांनी म्हटले आहे.

भय्यूजी महाराज यांचे आणि माझे अतिशय चांगले संबंध होते. मी त्यांच्या पार्थिवावर झालेल्या अंत्यसंस्कारालाही हजर होतो. भय्यूजी महाराजांच्या हत्येमागे नेमकं काय कारण आहे हे सांगता येणं कठीण आहे. मात्र ते कारण शोधून काढण्यासाठीच त्यांच्या मृत्यूची चौकशी होणे गरजेचे आहे. यासंदर्भात मी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशीही चर्चा केली आहे असेही आठवले यांनी म्हटले आहे. फोनवरून मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रातही सीबीआय चौकशीचीही मागणी केली आहे, या पत्राला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात होते त्यांनी मला हे सुचवले की भय्यूजी महाराज यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. त्याचमुळे मी ही मागणी करतो आहे असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?
पन्नास वर्षांच्या भय्यू महाराजांनी १२ जून २०१८ ला त्यांच्या निवासस्थानी स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. हे आत्महत्येचं प्रकरण आहे असं समजून पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर प्रकरण बंद करण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांचा ड्रायव्हर कैलास पाटील उर्फ भाऊ याला निवेश बडजात्या या वकिलांकडे पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्याने चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले. आश्रमातले काही लोक महाराजांना ब्लॅकमेल करत होते, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली होती.त्यानंतर भय्यूजींचा सेवक पोलिसांसमोर हजर झाल्यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं. आता रामदास आठवले यांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे ही हत्याच होती का? जर होती तर त्यामागचा उद्देश काय? ती कोणी केली हे आणि असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले आहेत.