रमझान सुरु असून पुण्यात हिदू-मुस्लिम एकतेचं अनोखं चित्र पहायला मिळालं आहे. रमझान सुरु असल्याने ठिकठिकाणी दर्गा आणि मशिदींमध्ये इफ्तार आणि नमाजचं आयोजन केलं जात आहे. मात्र येरवडा येथील सदलबाबा दर्ग्यात एक अनोखं चित्र पहायला मिळालं असून, सगळ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. येथे नमाज आणि संत तुकाराम महाराजांचं भजन एकत्र करत हिंदू-मुस्लिम एकतेचं उदाहरण देण्यात आलं. दर्ग्याचे प्रमुख मोहम्मद मुजवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व धर्मातील लोक येथे येत असतात. वेगवेगळ्या धर्मातील लोक कित्येक वर्षांपासून संगमवाडी परिसरात गुण्या गोविंदाने एकत्र राहत आहेत. जेव्हा वारकरी समाजाचे प्रमुख सचिन निगम यांनी दर्ग्यात येऊन भजन करण्याची परवानगी मागतिली तेव्हा आम्ही आनंदाने ती मान्य केली.

सचिन निगम यांनी सांगितलं की, ‘गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही सगळे एकत्र राहत आहोत. दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन भजन गात असतो. आम्ही दर्ग्यात जाऊनही प्रार्थना करतो, त्यामुळे तिथे इफ्तारच्या नमाजआधी भजन का करु नये असा विचार डोक्यात आला’.

काही कट्टरवाद्यांना हा विचार पटत नव्हता, त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असं दर्ग्याच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे इकराम खान यांनी सांगितलं. पण आम्ही त्यांना हिंदू-मुस्लिम एकतेसाठी असे प्रयत्न होणे गरजेचं असल्याचं पटवून दिलं अशी माहिती त्यांनी दिली.

रमझानच्या २१ व्या दिवशी म्हणजे ६ जूनला भजन आयोजित करण्यात आलं होतं. त्याचदिवशी उरुसही साजरा करण्यात आला. चारशेहून अधिक लोक उरुस साजरा करण्यासाठी दर्ग्यात जमा झाले होते. रमझानच्या २१ व्या दिवशी विशेष प्रार्थना केल्यानंतर रोजा मोडला जातो असं इकराम खान यांनी सांगितलं. दर्ग्यात भजन गायलं जाण्याची ही कदाचित पहिलीच वेळ होती असंही त्यांनी सांगितलं.