राज्यातील सरकार ज्या शक्ती व संघटनांच्या जोरावर सत्तेत आले त्यांच्या उन्मादीपणामुळेच गोिवद पानसरेंवर हल्ला झाला आहे. त्यामुळे हा हल्ला सरकार पुरस्कृत असून या घटनेचा योग्य तपास लागून हल्लेखोर व सूत्रधारांना शिक्षा मिळेपर्यंत डाव्या संघटना लढा देतच राहतील, असे प्रतिपादन भाकपचे महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत केले.
ज्येष्ठ कामगार नेते व विचारवंत गोिवद पानसरे यांच्या खुनाबाबत पोलिसांना ठोस धागेदारे मिळालेले नसल्याने याचा जाब सरकारला विचारण्यात येणार आहे. यासाठी ११ मार्च रोजी भायखळा राणीच्या बागेपासून आझाद मदानापर्यत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातून विविध २५ संघटनांनी आपली नोंदणी केली असून त्यांचे ५० हजारहून अधिक कार्यकत्रे मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती कानगो यांनी दिली.
कानगो म्हणाले,की धर्माध व भांडवलदारांची अभेद्य युती सद्या देशात व राज्यात उदयास आली आहे. याचेच उदाहरण म्हणजे कामगार कायदा बदलून कॉर्पोरेट उद्योगपतींना खुली सूट देण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. यास विरोध करणाऱ्या पानसरेंसारख्या विचारवंतास समाजातून संपविण्यासाठीच त्यांचा खून करण्यात आल्याचे कानगो यांनी सांगितले. पानसरेंच्या खुनाबाबत ११ मार्चला सरकार व पोलीसांना ठोस काहीतरी सांगणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभे करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यभरातील कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पत्रकार परिषदेला नामदेव गावडे, दिलीप पवार, एस. बी. पाटील, उदय नारकर, शिवाजी परुळेकर, भारत पाटील, हसन देसाई, लक्ष्मण वायदंडे, धनाजी गुरव, गौतम कांबळे, रघुनाथ कांबळे, सतिशचंद्र कांबळे, गणी आजरेकर, गिरीश फोंडे आिदसह कार्यकत्रे उपस्थित होते.
पोलिसांना थोडा वेळ देऊ
गोिवद पानसरे यांचा खून करणाऱ्या हल्लेखोरांसह त्यामागील खऱ्या सूत्रधारास पकडण्यसाठी पोलिस यंत्रणेचे त्यांच्यापरीने प्रयत्न सुरु आहेत. त्यांना त्यांचे काम करण्यासाठी अजून थोडा अवधी दिला पाहिजे असे मत भाकपचे राज्य सचिव भालचंद्र कानगो यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. पत्रकार परिषदेनंतर कानगो व दिलीप पवार यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेतली, पोलिसांच्या तपासाची दिशा समजावून घेतली. तसेच, चळवळीतील काही महत्त्वाच्या बाबी डॉ. शर्मा यांना सांगितल्या.