शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे समाधान केवळ ‘कृषिमूल्य न्यायाधिकरणा’ची स्थापना केल्यानेच होणार आहे आणि तशी तरतूद संविधानाच्या ३२३ ब (२)(ग) कलमात स्पष्टपणे केलेली आहे’, अशी भूमिका आपल्या पुस्तिकेतून मांडणाऱ्या अ‍ॅड.अजय तल्हार यांच्या सूचनेची दखल घेत राज्याचे माजी महाधिभक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी अ‍ॅड. तल्हार यांना पत्र लिहून त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनीही अ‍ॅड. तल्हार यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे.
अ‍ॅड. तल्हार यांनी ही माहिती देतांना सांगितले की, अ.भा. किसान महासंघाचे अध्यक्ष अनिल कुळकर्णी यांनी आपली औरंगाबादला भेट घेऊन घटनात्मक तरतुदीची अंमलबजावणी कशी करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातही याच न्यायाधिकरणाचा उल्लेख करून शेतकरी या विषयावर सहा पाने लिहिली आहेत. कर्जमुक्ती, कर्जमाफी, कर्जवसुलीत सवलत, जोडधंदा, सबसिडी इत्यादी कोणतेही उपाय केले तरी शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाही अथवा शेतकरी आत्महत्यांचा चढता आलेखही खाली येणार नाही. शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे समाधान केवळ ‘कृषिमूल्य न्यायाधीकरणी’ची स्थापना केल्यानेच होणार आहे आणि अशी न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद संविधानाच्या ३२३ ब (२)(ग) कलमात स्पष्टपणे केलेली आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील अ‍ॅड.अजय तल्हार यांनी लिहिलेल्या ‘कृषी कल्याण : राष्ट्र कल्याण’ या पुस्तिकेत केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मोहीत शाह यांनी या पुस्तिकेला प्रस्तावना लिहिली आहे. अ‍ॅड. अजय तल्हार यांनी सांगितले की, अ‍ॅड. श्रीहरी अणे, भालचंद्र नेमाडे, न्या. मोहीत शहा, डॉ. श्रीपाल सबनीस, गणेश पाटील, अनिल कुळकर्णीसारख्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी व विद्वानांनी असे न्यायाधिकरण स्थापन करण्याच्या विचारांना अनुकूलता दर्शविल्याने आपल्याला या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली असून, आज ना उद्या या विषयाची शासनाला दखल घ्यावीच लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhalchandra nemade shrihari aney
First published on: 15-04-2016 at 02:04 IST