महाराष्ट्रासाठी शनिवारची पहाट दुर्दैवी ठरली. मध्यरात्री सारेच झोपेत असताना दहा नवजात बालकांवर काळाने घाला घातला. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. नर्सने धूर पाहिल्यावर अग्निशामक दलाला पाचारण केले. सुदैवाने सात बालकांना वाचवणे शक्य झाले, पण दहा बालकांचा मृत्यू झाला. घडलेल्या प्रकाराचे देशभरात पडसाद उमटले. राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रकरणाची दखल घेत संवेदना व्यक्त केल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे सररकामधील एका मंत्र्यांने महत्त्वाचे विधान केले.
घडलेल्या प्रकारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेचच घटनेच्या चौकशी आदेश दिले. मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत मृत बालकांच्या कुटुंबीयांना देण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी महत्त्वाचे विधान केले. भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं. पण महत्त्वाची बाब म्हणजे, भविष्यात अशा घटना घडू नये या दृष्टीने राज्य सरकार कडक नियम बनविण्याकडे लक्ष देईल हे महत्त्वाचं आश्वासन मलिक यांनी राज्यातील जनतेला दिलं.
भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला असून ही दुर्दैवी घटना आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यादृष्टीने सरकार कडक नियम बनविण्याकडे लक्ष देईल अशी माहिती मुंबई @NCPspeaks चे अध्यक्ष @nawabmalikncp यांनी दिली. pic.twitter.com/hXOw2QaypC
— NCP Mumbai (@MumbaiNCP) January 9, 2021
“भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने नवजात शिशूंचा मृत्यू झाला असून ही दुर्दैवी घटना आहे. भविष्यात अशा घटना घडू नये या दृष्टीने सरकार कडक नियम बनविण्याकडे लक्ष देईल. भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या लहान मुलांबाबत मी तीव्र दु:ख व्यक्त करतो. रुग्णालयात लागलेल्या आगीची कारणे काय आहेत? हे तपासण्याची गरज असून जो कोणी या प्रकरणात दोषी असेल, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी केली.
“महाराष्ट्रातील हॉस्पिटल्स, नर्सिंग होम या सर्व ठिकाणी फायर ऑडिट केले गेले पाहिजे. जर फायर ऑडिटमध्ये त्रुटी असतील, तर हॉस्पिटल्समध्ये दुरुस्ती केल्याशिवाय सेवा देण्याची परवानगी देऊ नये. तसेच, कुठल्याही हॉस्पिटलला अयोग्य पद्धतीने खाजगी, शासकीय किंवा नर्सिंग होम चालविण्यासाठी परवानगी दिली असेल, तर तात्काळ त्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत”, असेही मलिक म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 2:25 pm