शनिवारची पहाट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली. मध्यरात्री सारेच झोपेत असताना दहा नवजात बालकांवर काळाने घाला घातला. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये घडलेल्या या घटनेत तीन बालकांचा आगीमुळे तर सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला. या घटनेनंतर विविध गोष्टी उघड होत असतानाच भाजपाचे नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरे सरकावरला सवाल केला.
“भंडारा येथील १० चिमुकल्या बाळाच्या हत्येनंतर काही संतापजनक माहिती समोर येते आहे. हे प्रकरण लवकर थंड (व्हावे आणि) गुलदस्त्यात जावे म्हणून (प्रयत्न सुरू आहे). निष्पाप मृत तान्ह्या बाळांच्या आई वडिलांना आज मीडियाशी बोलू नका म्हणून धमकावले जात आहे? कोणाकोणाचा आवाज दाबणार आहात?”, असा प्रश्न राम कदम यांनी विचारला. तसेच त्या ट्विटमध्ये महाविकास आघाडीचा हॅशटॅगही वापरला.
भंडारा येथील 10 चिमुकल्या बाळाच्या हत्ये नंतर काही संतापजनक माहिती समोर येते आहे. हे प्रकरण लवकर थंड गुलदस्त्यात जावे म्हणून . निष्पाप मृत तान्ह्या बाळाच्या आई वडिलांना आज मीडियाशी बोलू नका ? म्हणून धमकावले जात आहे? कोणा कोणाचा आवाज दाबणार आहात ? #MVA
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) January 10, 2021
दरम्यान, या मुद्द्यावर बोलताना भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांनी एक मागणी केली. “भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना कळताच मन सुन्न झाले. अशी हानी पुन्हा होऊ नये म्हणून प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्र fire extinguisher पाहिजे आणि ते कसे वापरावे याचं प्रशिक्षण तिथल्या nursing व इतर staff ला दिले गेले पाहिजे”, अशी मागणी त्यांनी उद्धव ठाकरे सरकारकडे केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 12:09 pm