भंडाऱ्यात आश्रमशाळेच्या क्रीडा स्पर्धेदरम्यान दिलेल्या मध्यान्ह भोजनातून जवळपास 174 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व विद्यार्थी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

174 पैकी 155 जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले आहे. तर 19 जणांवर अजूनही जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय. शनिवारी दुपारच्या जेवणानंतर बहुतांश जणांना मळमळ वाटणे, डोकेदुखी व उलट्या होण्याचा त्रास व्हायला सुरूवात झाली. त्यानंतर त्रास होणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत अस्वस्थ वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणण्याचे कार्य सुरु होते. सदर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी दोन हजार 700 मुलांसह 300 शिक्षकांनी सहभाग नोंदविला आहे.

विषबाधा अन्नातून व पाण्यातून झाल्याचे रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे म्हणणे आहे. पिण्यासाठी देण्यात येणारे पाणी संपल्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील जलकुंभाचे पाणी पिण्यासाठी दिले, असे खेळाडूंचे म्हणणे आहे.