देवेंद्र फडणवीस आणि गडकरी पुढील लक्ष्य

नागपूर :  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करून त्यांचा विषय तेथेच संपवला आणि या पोटनिवडणुकीत भाजपला ताकद दाखवून दिली. आता पुढे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे माझे लक्ष्य आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांच्या भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. प्रफुल्ल पटेल यांनी हात वर केले होते, पण माझ्या संघटनेने हा विजय खेचून आणला, असा दावाही केला.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांनी ४८ हजारांहून अधिक मताधिक्क्याने भाजपच्या उमेदवाराला हरवले. नाना पटोले यांनी २०१४ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली होती. नंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेतकरी आणि ओबीसींच्या मुद्दय़ांवरून टीका केली आणि खासदारकीचा राजीनामा दिला. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय (गवई), पीरिपाची आघाडी होती. येथे राष्ट्रवादीचे कुकडे यांचा विजय झाला. मात्र नाना पटोले म्हणतात, आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारली. काँग्रेस तसेच माझी संघटना छावाच्या परिश्रमामुळे विजय खेचून आणता आला.

आम्ही (छावा संघटना) उद्दिष्टे घेऊन पुढे जात असतो. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे आमचे लक्ष्य होते, त्यांना पराभव बघावा लागला. माझ्या मतदारसंघात येऊन गडकरी, फडणवीस यांनी मला शिव्या घातल्या. आम्ही अंगावर आल्यास शिंगावर घेणारे लोक आहोत. खुर्चीचे किंवा धनसंपत्तीचे आमिष दाखवून आम्हाला विकत घेता येत नाही. आमची लढाई जनतेसाठी आहे. जनतेसाठीच मोदीविरुद्ध बंड केले. त्यामुळेच जनता आमच्या बाजूने उभी राहिली.

जनता चिन्हावर नाही तर नानासोबत राहिली आहे. २००९ मध्ये अपक्ष लढलो तरी अडीच लाख मते घेतली. कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नसणारा एक माणूस महाराष्ट्रात दाखवा. मी मातबर राजकीय नेता नाही. भाजप वारंवार दावा करते की, नाना पटोले मोदी लाटेमुळे निवडून आले, गडकरींमुळे निवडून आले. या निवडणुकीत तर मोदी, गडकरी, फडणवीस सगळेच होते. त्यांना आपला उमेदवार निवडून का आणता आला नाही, असा सवालही केला. ज्या मुद्यावर मी राजीनामा दिला, त्याला लोकांचे समर्थन लाभले.

भाजप नेत्यांनी साम-दाम-दंड-भेद असे पर्याय वापरले.  सरकारी अहवालाप्रमाणे भाजपचे लोक मला शिव्या घालायला लागले आणि निवडणूक माझ्याभोवतीच फिरत राहिली. गावागावात आमची छावा ही तरुण पोरांची संघटना आहे. आरएससीची संघटना या छावासमोर टिकली नाही. त्यांचे मत विभाजन घडवून आणण्याचे षड्यंत्र यशस्वी झाले नाही. याचे कारण छावा संघटनेत कोणत्या एकाच जातीची मुले नाहीत. सर्व जातीधर्माची आहेत. ५० हजार तरुण आहेत. भंडारा-गोंदिया हा मतदारसंघ राम आस्वलेंपासून भाजपचा गड आहे, असे म्हटले जात होते. तसे काहीही नव्हते.

प्रफुल्ल पटेल सारखे या भागात अल्पसंख्याक समाजाचे नेते होते. त्यांच्याविरोधात बहुजन समाजाचे नेते म्हणून राम आस्वले, शिवणकर यांना लोक मते देत होते. पण भाजपला चेहरा नव्हता. २००९ मध्ये भाजपची जमानत जप्त झाली. लोकसभेत केवळ एक लाख २० हजार मते मिळाली.

 

माझ्यामुळेच भाजप विजयी

नानाशिवाय आम्ही ही निवडणूक जिंकू शकतो, असा संदेश भाजपला द्यायचा होता. आमचे संघटन किती मजबूत आहे हे दाखवायचे होते, परंतु त्यांना हेच सांगायचे आहे की, संघटना असती तर २००९ मध्ये जमानत जप्त झाले असते काय? मी भाजपमध्ये आल्यानंतर सगळे आमदार निवडून आले तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीत बहुमत मिळाले. हे जिल्ह्य़ातील भाजपच्या इतिहासात पहिल्यांदा घडले होते. भाजप कधीच जि.प., पं.स.मध्ये बहुमतात आली नाही. मी पहिल्यांदा त्यांना हा मान मिळवून दिला. पहिले एक आमदार, दोन आमदार असे यायचे. पहिल्यांदा ही संख्या मी वाढवली, खासदार भाजपचा झाला. हा भाजपचा जुना बालेकिल्ला असता तर पटले निवडून आले असते.

प्रफुल्ल पटेल यांनी हात वर केले

मतदान यंत्रात गडबड केली नसती तर ७५ टक्के मतदान झाले असते. मतदारांनी पोटनिवडणुकीत सरकारविरोधात मत प्रगट केले हे आणखी तीव्रतेने समोर आले असते. आमचे युनिट आहे. प्रफुल्ल पटेल यांनी हात वर केल्यानंतर मी आमच्या लोकांना सांगितले ही निवडणूक आमची आहे. भाजपने नाना पटोले यांना लक्ष्य केले तर माझे लोक कसे शांत बसतील? आम्ही आघाडीचा उमेदवार म्हणून प्रचार केला. या निवडणुकीत प्रचाराच्या काळात प्रफुल्ल  पटेलांनी फारसा रस दाखवला नाही. भाजपने पटेल यांच्यावर  दडपण आणले असावे, त्यांच्या भाषणात बरीच उलटसुलट विधाने होती, मला निवडून दिले असते तर ही पोटनिवडणूक झाली नसती, असे ते भाषणात सांगत होते. याला आघाडी धर्माचे भाषण कसे म्हणता येईल, असा खडा सवालही पटोले यांनी या मुलाखतीत केला.