भंडाऱ्यात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होण्याबरोबरच राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेवर रोष व्यक्त होताना दिसत आहे. भंडाऱ्यांतील दुर्घटनेवरून विरोधकांनीही ठाकरे सरकारला सवाल करत धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीसह महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर टीकास्त्र डागलं आहे.

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात दहा मुलांचा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यानं मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारवरही टीका होत आहे. घटनेवर भाष्य करताना शिवसेनेनं मोदी सरकार व राज्यातील भाजपा नेत्यांना ‘सामना’तून खडेबोल सुनावले आहे.

“नवे वर्ष उजाडायला सुरुवात झाली आणि महाराष्ट्राच्या जीवनात हा अंधार निर्माण झाला. मृत बालकांचा आक्रोशही त्या धुरात गुदमरून गेला असेल, पण माता-पित्यांच्या आक्रोशाने फक्त भंडाराच नाही, तर महाराष्ट्रासह संपूर्ण देश हेलावला आहे. राज्यातील नव्हे तर देशातील आरोग्य व्यवस्थेवर या घटनेने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आग शॉर्टसर्किटने लागली की आणखी कशाने लागली याची चौकशी केली जाईल. राज्यातील इतर सर्व रुग्णालयांतील शिशू केअरच्या युनिटचेदेखील ऑडिट करण्याचे आदेश सरकारने आता दिले, पण ही जाग दहा बालकांच्या मृत्यूनंतर आली याचे दुःख कुणाला वाटते काय? पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे भंडाऱ्यातील घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे, पण विषय फक्त भंडाऱ्याचा नाही, तर देशातील एकंदरीत आरोग्य व्यवस्थाच गुदमरून तडफडत आहे,” अशी चिंता शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

“महाराष्ट्रातील आरोग्य सेवा देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत बरी असेल, पण बरी म्हणजे कामचलाऊ असणे व सर्वोत्तम असणे यात फरक आहे. म्हणूनच भंडाऱ्यात दहा बालकांचे मृत्यू हा धक्कादायक प्रकार आहे. भारतीय जनता पक्षाने या दुर्घटनेचे राजकीय भांडवल लगेच सुरू केले. हा बेशरमपणाचा कळस आहे. दहा बालकांचे मृत्यू ही सरकारची जबाबदारी नक्कीच आहे, पण मागची पाच वर्षे सत्तेवर असलेल्यांनाही आपली कातडी वाचविता येणार नाही. विदर्भाच्या विकासात भंडाऱ्यातील सामान्य रुग्णालयाचा विकास येत नाही काय? हा प्रश्न असला तरी या दुर्घटनेचे राजकारण करणे हे त्या मृत बालकांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखेच आहे. भंडाऱयातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा,” अशी सूचना शिवसेनेनं केली आहे.

“केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा, निवडणुकांवरील उधळपट्टी थांबवा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा. ‘एम्स’सारख्या संस्था पंडित नेहरूंनी उभ्या केल्या तसे काही प्रमुख शहरांत घडावे. दुर्घटनेनंतर सरकारी यंत्रणेने अश्रू गाळण्यापेक्षा आधीच योग्य खबरदारी घेतली तर रुग्णालयांमध्ये होणाऱ्या दुर्घटना आणि बालकांचे मृत्यू टळू शकतील. गोरखपुरात प्राणवायूअभावी शंभरावर बालके मरण पावली. भंडाऱ्यात दहा बालके आगीत जळून गेली. त्यांच्या अभागी माता-पित्यांचे अश्रूच खरे, त्या अश्रूत शापवाणी आहे. त्या शापाचे धनी प्रशासकीय यंत्रणेने होऊ नये,” असं म्हणत शिवसेनेनं मोदी सरकारला टोला लगावला आहे.