धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर खुपच कमी झाला असुन तालु्नयाच्या उर्वरित भागात पावसाने गुरूवारपासून विश्रांती घेतली आहे. मात्र जुलै महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या चांगल्या पावसामुळे भंडारदरा धरण ७० टक्के भरले असून जिल्हय़ातील सर्वात मोठय़ा मुळा धरणाचा साठा ४५ टक्क्य़ांपर्यत पोहचला आहे. आढळा धरणही ६० टक्के भरले आहे. तालुक्यातील बोरी आणि बेलापूर तलावांचा अपवाद वगळात अन्य सर्व लघुपाटबंधारे तलाव तुडुंब भरले आहेत.
जुलै महिन्यातील चांगल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठय़ात लक्षणीय वाढ झाली आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शुक्रवारी सांयकाळी ७ हजार ७३१ दक्षलक्ष घनफूट झाला होता. निळवंडेच्या पाणीसाठय़ानेही ४ टीएमसीचा टप्पा ओलांडला (४ हजार २६ दक्षलक्ष घनफूट) मुळा धरणाचा पाणीसाठा ११ हजार ३६९ दक्षलक्ष घनफूट झाला आहे. साठ टक्के भरलेल्या आढळा धरणात ६४० दक्षलक्ष घनफूट पाणी आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे जुलै महिन्यात सर्वाधिक म्हणजे १ हजार ४७१ मिलीमीटर तर घाटघरला १ हजार ४२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याच कालावधीत भंडारदरा येथे ७२८ तर पांजरेला १ हजार १७० मिलिमीटर पाऊस पडला या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठय़ात जुलै महिन्यात ६ हजार ७८९ दक्षलक्ष घनफूटाने वाढ झाली. भंडारदरा धरणातून वीज निर्मितीसाठी ८४२ क्युसेकने विसर्ग सुरु असुन त्यामुळे २१४ दक्षलक्ष घनफूट पाणी खर्ची पडले.
जुलै महिन्यात मुळा पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्रगड परिसरातही चांगला पाऊस पडला. जून अखेर मुळा धरणाचा पाणीसाठा ५ हजार ६०८ दक्षलक्ष घनफूट होता. त्यात महिनाभरात ५ हजार ७६१ दक्षलक्ष घनफुटांनी वाढ झाली.