भंडारदरा धरणातील पाण्याची पातळी धरणाच्या िभतीजवळ २०५ फुटांपेक्षा जास्त झाली असून आता धरण फक्त दहा फूट भरणे बाकी आहे. मंगळवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठा ८० टक्के झाला. काल सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून रतनवाडीला मंगळवारी सकाळी नऊ इंच तर घाटघरला आठ इंच पावसाची नोंद झाली. मुळा धरणात २४ तासांत १ टीएमसीपेक्षा अधिक तर भंडारदऱ्यात ६०० दशलक्ष घनफुटांपेक्षा जास्त पाण्याची भर पडली.
सोमवारी दिवसभर तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर आज सकाळपर्यंत टिकून होता. रतनवाडी येथे २२४ तर घाटघरला २०५ मिमी पावसाची नोंद झाली. अन्य ठिकाणचा पाऊस पुढीलप्रमाणे- पांजरे ११५, वाकी ८०, निळवंडे ५७, अकोले ५०, कोतूळ २०, वाकी ८. या पावसामुळे भंडारदरा धरणात चोवीस तासांत सुमारे ६२० दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. त्यातील काही पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्यात आले तर धरणाच्या पाणीसाठय़ात ६४८ दशलक्ष घनफुटाने वाढ झाली. सायंकाळी धरणातील पाणीसाठा ८ हजार ८९१ दशलक्ष घनफूट होता.
मुळा नदीचे उगमस्थान असणारा अजा पर्वत तसेच हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांत कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने मुळा नदीचे पाणी चांगलेच वाढले होते. चोवीस तासांत मुळा धरणाच्या पाणीसाठय़ात १ हजार ८९ दशलक्ष घनफुटाने वाढ झाली. मुळा धरण आता ५८ टक्के भरले असून सायंकाळी धरणातील पाणीसाठा १४ हजार ९१७ दशलक्ष घनफूट होता. कृष्णवंती तसेच टिटवीच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यामुळे निळवंडेच्या पाणीसाठय़ातही ४१८ दशलक्ष घनफुटांची भर पडली. सायंकाळी निळवंडेचा पाणीसाठा ३ हजार ७९७ दशलक्ष घनफूट झाला होता. निळवंडे धरण आता ६१ टक्के भरले आहे. चार दिवसांत आढळा धरणातही नवीन पाण्याची भर पडली व धरण ४० टक्के भरले. आज सकाळी धरणातील पाणीसाठा ४२४ दशलक्ष घनफूट झाला होता.