आमच्या वाटेला जे दिवस आले ते तुझ्या येऊ नये, त्यासाठी तू शिक्षण घे आणि मोठी हो, असा सल्ला देणाऱ्या वडिलांचा परिक्षेच्या तोंडावर मृत्यू होतो. तरीही मनोधैर्य खचू न देता भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याच्या खैरी (पट) गावातील मुलीने वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून सोमवारी रात्रभर अभ्यास करुन दुसऱ्या दिवशी इंग्रजीचा पेपर दिला. पेपर सोडविल्यानंतर प्रणालीने आपल्या लाडक्या पित्याला अखेरचा निरोप दिला. प्रणाली खेमराज मेश्रासोबत घडलेली ही हृदयद्रावक घटना सामाजिक संदेश देणारीही ठरली आहे.

प्रणाली सध्या आई आणि भावासोबत राहतेय. प्रणालीचे वडिल एसटीमध्ये चालक म्हणून कार्यरत होते. आपण अनुभवलेले दिवस आपल्या दोन्ही मुलांच्या वाट्याला येऊ नयेत. त्यांनी शिक्षण घेऊन मोठं व्हावे म्हणून ते अभ्यासासाठी नेहमीच प्रेरीत करीत होते. यंदा प्रणाली दहावीला आहे. तिचे बोर्डाचे पेपर सुरू असतानाच वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी, ५ मार्च रोजी इंग्रजीचा पेपर होता. मात्र आदल्या दिवशी रात्री आठ वाजता प्रणालीच्या वडिलांचे निधन झाले. मेश्राम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.