संदीप आचार्य
भंडारा जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांडात १० बालकांचा होरपळून व गुदमरुन मृत्यू झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सकासह चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर एका डॉक्टरसह तीन परिचारिकांना सेवामुक्त करण्यात आले. याबाबत नेमलेल्या विभागीय आयुक्तांच्या समितीने रुग्णालयातील रिक्त जागा भरणे, जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्युत अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम अभियंता नियुक्ती आणि जिल्हा रुग्णालयांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याची शिफारस केली आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षामध्ये लागलेल्या आगीत तीन बालकांचा होरपळून तर सात बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. या आगीच्या वेळी अग्निशमन दलाचे जवान, वॉर्डबॉय, सुरक्षा रक्षक व टेलिफोन ऑपरेटर यांनी सात बालकांना तर वाचवलेच, शिवाय या शिशु कक्षाशेजारी असलेल्या अतिदक्षता विभाग व सिझेरियन विभागातील रुग्णांनाही अन्यत्र हलवल्याबद्दल विभागीय आयुक्तांच्या अहवालात कौतुक करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेनंतर तातडीने भंडारा जिल्हा रुग्णालय तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे व सहा जणांची समिती नेमली होती. या समितीने तीन दिवसात अहवाल द्यावा असेही सांगण्यात आले होते. मात्र समितीने ११ दिवसांनी आपला अहवाल दिला असून या अहवालात नमूद केल्याप्रमाणे शिशू विभागातील रेडिएंट वॉर्मर कंट्रोल पॅनलमधील इलेक्ट्रिकल सर्कलमध्ये ठिणगी पडल्याची शक्यता वर्तविण्यात आली. या ठिणगीमुळे गादी तसेच त्यावरील प्लास्टिक पेटले. प्लास्टिकमुळे दोन मिनिटात खोलीत धुर झाला. हा कक्ष बंद असल्यामुळे आग अन्यत्र पसरली नाही, मात्र तीन बालके होरपळून तर सात बालके धुरामुळे गुदमरुन मरण पावल्याचे अहवालात नमूद केले आहे.

यापूर्वीही येथील मिनिएचर सर्किट ब्रेकरमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. रुग्णालयातील विद्युत विभागाचे कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्यात समन्वय नसणे, जिल्ह्यासाठी विद्युत विभागाचा एकच अभियंता असल्याने रुग्णालयासाठी पुरेसा वेळ व तपासणी न होणे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अचानक तपासणी न होणे या त्रुटी समितीला आढळून आल्या. त्याचप्रमाणे आगीची घटना घडली त्या दिवशी या शिशू विभागातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. रुग्णालयाच्या इलेट्रिशियनने एक फेज दुरुस्त करून खंडित पुरवठा पुन्हा सुरु केला होता. याशिवाय भंडारा जिल्हा रुग्णालयातील मंजूर ४८ पदांपैकी १३ पदे भरलेली नव्हती. २४ अधिसेविकांपैकी १२ अधिसेविकांना करोनाचे काम देण्यात आले होते. लहान मुलांच्या विभागातील दोन डॉक्टरपैकी एका डॉक्टरला करोनाचे काम देण्यात आले होते. कामाचे नियोजन व पर्यवेक्षण यात ताळमेळ नव्हता. परिणामी कर्मचारी आपल्या मनाप्रमाणे काम करत असल्याचे दिसून आले. याची प्रमुख जबाबदारी ही उपजिल्हा शल्यचिकित्सकांची होती. तसेच जिल्हा शल्यचिकित्सकासह ज्या चौघांनी कर्तव्यात कसूर केली त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर एका डॉक्टरसह तिघा परिचारिकांना सेवामुक्त करण्यात आले.

सर्व जिल्हा रुग्णालयांचे हेल्थ ऑडिट
या दुर्घटनेचा बोध घेऊन राज्य शासनाच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसांत हेल्थ ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ.रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल.

भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांना निलंबित, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिला बडे यांची अकार्यकारी पदावर बदली, वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची, परिसेविका ज्योती भारसकर यांच्यावर निलंबनाची तर कंत्राटी अधिपरिसेविका स्मिता आंबिलडुके आणि शुभांगी साठवणे यांच्यावर सेवा समाप्तीची कंत्राटी बालरोग तज्ज्ञ डॉ.सुशिल अंबादे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.