काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोक भांगरे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. शिर्डी मतदारसंघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार सदाशिव लोखंडे यांचे विजयाबद्दल अभिनंदन करणारे फ्लेक्स भांगरे यांच्या वतीने लावण्यात आले आहेत. त्यातून या गोष्टीला पुष्टी मिळते. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भांगरे यांनी महायुतीला मदत केल्याची चर्चा असून लवकरच ते शिवसेनेत जाहीररीत्या प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
लोकसभेच्या या निवडणुकीत प्रचारापासून अलिप्त राहण्याची भूमिका भांगरे यांच्या गटाने घेतली होती. मावळते खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मागील निवडणुकीत भांगरे यांची शिवसेनेची उमेदवारी रद्द करून आणली. याचा राग त्यांच्या मनात होता. काँग्रेस कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेऊन भांगरे यांनी प्रचारापासून अलिप्त राहण्याची जाहीर भूमिका घेतली होती. मात्र ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी वाकचौरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. तथापि प्रचारात ते अथवा त्यांचे सहकारी प्रचारात कुठेही सहभागी झाल्याचे दिसले नाही. अंतिम टप्प्यात त्यांनी शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांना मदत केली असल्याची चर्चा आहे. भांगरे यांच्या प्रभावक्षेत्र असणा-या शेंडी भंडारदरा परिसरात महायुतीच्या उमेदवाराला चांगल्या प्रमाणात पडलेली मते हे याचेच द्योतक असल्याचे दिसते. शिवसेना उमेदवाराला मदत करण्यापूर्वी भांगरे यांची शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचेबरोबर चर्चा झाली होती असेही समजते. शनिवारी शहरात तसेच तालुक्यातही काही ठिकाणी नवनिर्वाचित खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड भांगरे यांच्यातर्फे लावण्यात आले आहेत. त्यामुळे भांगरे यांचा शिवसेनेत प्रवेश नक्की असल्याचे समजले जाते.