शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या (८ डिसेंबर) पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीनही पक्षांवर भाजपाने निशाणा साधला आहे. या तिन्ही पक्षाचं शेतकरी प्रेम हे नकली आहे, असा आरोप भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

उपाध्ये यांनी ट्विटद्वारे पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, “बंदला पाठिंबा देणारे सत्ताधारी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अद्याप पुरेशी मदत दिली नाही. दुध उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. ना करोना काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना कोणती मदत केली.”

आणखी वाचा- कृषी क्षेत्रासंबंधी शरद पवारांनी लिहिलेल्या पत्रावर संजय राऊतांचं भाष्य, म्हणाले…

तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात खाजगीकरण सुरू झालं. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी पाठवलेलं पत्र आज समोर आहे, ज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी खाजगीकरणाला चालना देण्याबाबत त्यांनी लिहीलं आहे, अशा शब्दांत केशव उपाध्ये यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला.