तुकाराम झाडे, लोकसत्ता

हिंगोली : भारतरत्न नानाजी देशमुख यांनी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाऊन तेथील चित्रकूट परिसरात स्वावलंबी, आत्मनिर्भर, अशी अनेक गावे निर्माण केली. ही गावे पाहण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. आजही अनेकजण चित्रकूटला भेट देतात. मात्र, नानाजी यांचे मूळ गाव असलेले  सेनगाव तालुक्यातील कडोळी  हे पाण्याच्या बाबतीत परावलंबी झाले आहे. कडोळीसाठीची शासकीय नळ योजना बंद असून ग्रामस्थांची तहान खासगी नळ योजनेच्या भरवशावर भागवली जात आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडोळी येथे आल्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना जाहीर केली. मराठवाडा व विदर्भातील शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, तसेच शेतकऱ्यांना कृषी औजारे उपलब्ध व्हावीत, यासाठी ही योजना हाती घेतली. मात्र, नानाजींच्या  कडोळी गावी विकासकामेही झाली नाहीत. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या कडोळी गावात पूर्वी भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा योजना हाती घेतली होती. मात्र, या योजनेचे पाणी गावात मिळालेच नाही. त्यानंतर २०१३ मध्ये जलस्वराज प्रकल्पांतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले. त्यासाठी गावालगत जलकुंभही उभारण्यात आला. शिवाय पाणीस्रोत उपलब्ध करण्यासाठी विहीर घेण्यात आली. काही दिवस गावात पाणीपुरवठा झाल्यानंतर ही योजनाही बंद पडली आहे.

सध्या गावात नऊ विंधन विहिरींवर विद्युत पंप बसवून ठिकठिकाणी टाक्या उभारण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणावरून गावकरी पाणी भरून नेतात. तसेच काही गावकऱ्यांनी गावालगत असलेल्या विहिरीवरून जलवाहिनी टाकून पाणी गावात आणले असून या खासगी योजनांवरून गावकऱ्यांची तहान भागवली जाते. विशेष म्हणजे गावात पाच खासगी नळ योजना असून प्रत्येक प्रभागात पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात मात्र विंधन विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्यानंतर गावकऱ्यांना खासगी नळ योजनेचा आधार घ्यावा लागतो.

या शिवाय नानाजी देशमुख यांच्या नावाने सुरू केलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्येही गावात सिंचनासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला नाही. त्यामुळे मोजक्याच शेतकऱ्यांकडे विहीर असून त्यांनाच शेतीसाठी पाणी मिळते. मात्र गावलगत तलाव किंवा सिंचनाची व्यवस्था करणारे प्रकल्प या ठिकाणी घेतलेच नाहीत. त्यामुळे नानाजींच्या गावातीलच अल्पभूधारक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्याचे चित्र आहे.

गावातील बेरोजगारी व इतर प्रश्न सोडविण्यासाठी नानाजी देशमुख प्रतिष्ठानच्यावतीने कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी २०१६ मध्ये राज्य शासनाकडे परिसरातील १२ एकर जमीन प्रतिष्ठानला दिल्यास त्याठिकाणी कौशल्य विकास केंद्र सुरू करून ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न होते. मात्र, शासनाच्या दफ्तर दिरंगाईचा फटका या प्रतिष्ठानलाही बसला आणि ते प्रस्ताव कागदावरच राहिले. तीन वषार्ंनंतरही तो प्रस्ताव मंजूर झालाच नाही.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी गावाला भेट देऊन मोठा कार्यक्रम घेतला. भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेतून पाच लाख ७४ हजार ६०० रुपये खर्चातून सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले. तसेच आमदार स्थानिक विकास कार्यक्रमअंतर्गत १४ लाख ९९ हजार रुपये खर्च करून सिमेंट रस्त्याचे काम केले. या कामाव्यतिरिक्त गावाचा विकास कागदोपत्रीच असल्याने ग्रामस्थांत नाराजीचे चित्र आहे.

गतवर्षीच नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाला तो चित्रकुट व परिसरातील भागांमध्ये केलेल्या मोठया कार्यामुळे. दीनदयाळ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्न सोडवून अनेकांच्या हाताला कामे दिली. गावे स्वावलंबी बनवण्याचा एक आदर्श घालून दिला. पण नानाजींचे मूळ गावच आज खासगी नळ योजनेवर अवलंबून आहे.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. विविध योजनांच्या घोषणा केल्या. कौशल्य विकासचे केंद्रही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यातील काहीच झाले. केंद्र झाले असते तर तरुणांना रोजगार मिळाला असता. पाण्याचीही बिकट अवस्था आहे. उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागणार आहे. ग्रामस्थांमध्ये एक प्रकारची नाराजी आहे.

– उषाताई माहुरकर, सरपंच, कडोळी

नानाजी देशमुख यांच्या नावाने कृषी संजीवनी योजना काढण्यात आली आहे. त्याचा लाभ निश्चितच मिळत आहे. त्याच माध्यमातून कडोळी येथे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक लागणारी १२ एकर जमीन अद्याप मिळाली नाही. जिल्हा प्रशासनाकडून जमीन ताब्यात मिळण्याबाबत लवकरच शासनाला प्रस्ताव जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली.  ही जमीन पूर्वी मंदिराला दान केली होती. ती शासनाने काढून घेतली, ती जमीन आता सरकार जमा झाली असल्याने, जमीन मिळावी यासाठीचा प्रस्ताव लवकरच जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविला जाणार आहे. कडोळी गाव दत्तक घेतल्यानंतर गावात सुमारे २५ लाख रुपये खर्चातून सिमेंट रस्ते केले, सुमारे वीस लाख रुपये खर्च करून एक सभामंडप बांधण्यात आले. मात्र, पाणी योजनेमध्ये गावातील काही जणांनी आडकाठी आणल्याने सारे अडले आहे.

 – तान्हाजी मुटकुळे, आमदार