गेल्या चाळीस वर्षापासून देशात सांप्रदायिक आणि नारदीय कीर्तन सेवा देणारे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी यांचे आज शनिवारी  सकाळी ११.३० च्या सुमारास हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती कळताच अनेकांना धक्का बसला असून जिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी झाली होती. वारकरी सांप्रदायाची पताका गेल्या अनेक वर्षापासून एकनिष्ठपणे सांभाळणार्‍या भरतबुवांनी बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणचा कीर्तन महोत्सव देशभरात पोहचवला. मागील १६ वर्षापासून ते या महोत्सवाचे उत्कृष्ट संयोजक म्हणून जबाबदारी भरतबुवांच्या निधनाने सांप्रदायिक चळवळीची मोठी हानी झाली आहे.

संत चरित्राचे गाढे अभ्यासक असलेले राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी यांना आज शनिवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रूग्णालयात आणण्यात आल्यानंतर वैद्यकिय अधिकार्‍यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. भरतबुवांच्या निधनाची वार्ता वार्‍यासारखी शहरभर पसरली अन् अनेकांना त्यांच्या निधनाने धक्का बसला. माहिती मिळताच जिल्हा सामान्य रूग्णालयात सर्व क्षेत्रातील नागरिकांनी आणि प्रतिष्ठितांनी गर्दी केली होती.

भरतबुवा रामदासी हे मुळचे रूई धानोरा (ता.गेवराई) येथील रहिवासी असून बीड शहरातील सराफा रोडवरील राममंदिर गल्लीत ते वास्तव्यास होते. गेल्या चाळीस वर्षापासून देशभरात सांप्रदायिक, वारकरी आणि नारदीय कीर्तन सेवा केली आहे. बीडचे नाव सांप्रदायीक चळवळीच्या माध्यमातून देशाच्या पटलावर पोहचवण्यात भरतबुवांचा सिंहाचा वाटा होता. तसेच बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणचा कीर्तन महोत्सव देशभरात पोहचवला. भरतबुवांच्या निधनाने सांप्रदायिक चळवळीचे मोठी हानी झाली आहे. भरतबुवांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सुन, नात, दोन भाऊ, भावजयी आदी परिवार आहे.

उद्या सकाळी अंत्यसंस्कार

भरतबुवा रामदासी यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी (दि.1) मार्च रोजी सकाळी 9 वाजता शहरातील मोंढा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.तत्पूर्वी सराफा लाईन, राम मंदिर गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढली जाणार आहे.

कीर्तन महोत्सवाचा आधारस्तंभ हरपला-गौतम खटोड

खटोड प्रतिष्ठानच्या कीर्तन महोत्सवाच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी महाराजांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले. त्यांचे अकाली निधन झाल्याने धक्का बसला. सोळा वर्षापासून बीडमध्ये कीर्तन महोत्सवाची परंपरा अव्याहत सुरु ठेवण्यासाठी रामदासी महाराजांनी अलौकीक कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा महोत्सव राज्यभरात पोहचला. महाराजांच्या निधनाने कीर्तन महोत्सव पोरका झाला असून महोत्सवाचा आधारस्तंभ हरपला आहे अशा शब्दात प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड व सचिव सुशील खटोड यांनी शोक भावना व्यक्त केल्या.

बीडच्या कीर्तन महोत्सवाचे प्रणेते

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी हे प्रचंड अभ्यासू, व्यासंगी आणि परखड वक्ते म्हणून सुपरिचित होते. त्यांनी अनेक तरुणांना कीर्तनाचे शास्त्र शुद्ध प्रशिक्षणही दिले. १६ वर्षापुर्वी स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाची मुर्हुतमेढ राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवांनी रोवली. कीर्तन महोत्सवाच्या मंडप उभारणीपासून ते सांगतेपर्यंत संयोजनापासून सुत्रसंचालनापर्यंत भरतबुवा रामदासी महाराज महत्वाची भूमिका महत्वाची असायची. 31 डिसेंबर 2019 ते 10 जानेवारी 2020 या कालावधीत झालेला 16 व्या कीर्तन महोत्सवाची भरतबुवांच्या प्रासादिक कीर्तनानेच सांगता झाली होती. बीड येथील कीर्तन महोत्सवाला देशभरात पोहचवण्यात भरतबुवांचे मोठे योगदान राहिले.