X

भारिप-एमआयएम एकत्र लढणार

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे सूतोवाच

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे सूतोवाच

भारित बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस ए इतेहादूल मुसलमीन (एआयएम) हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असून खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी युतीला होकार दिला आहे. त्यामुळे जागा वाटप व इतर बाबीसंदर्भात लवकरच दिल्ली येथे चर्चा होईल व युती जाहीर करण्यात येईल, अशी माहिती अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सरकार मद्य प्राशन केल्याप्रमाणे काम करीत असून देशातील अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. काही उद्योजकांना लाभ पोहोचवण्यासाठी सरकार विरोधी विचारांच्या उद्योजकांमागे सीबीआय, ईडी, आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावून दबाव टाकत आहे. विरोध शमवण्यासाठी सरकार दडपशाहीचे धोरण आखत असून त्यामुळे देशातील जवळपास ७५ हजार व्यापारी कुटुंब कायमस्वरुपी देश सोडून विदेशात स्थलांतरीत झाली आहेत. त्यांनी देशातील अर्थव्यवस्थेतून पैसा काढून घेतला असल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन सुरू आहे. सरकारने वेळीच कार्यप्रणालीत सुधारणा न केल्यास १९९० प्रमाणे देश आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दिवाळखोर ठरेल असे ते म्हणाले.

दरम्यान, भविष्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता भारिपने एमआयएमला पत्र लिहून युती करण्याची इच्छा दर्शवली असून त्याला एमआयएमने होकार दिला आहे. तर दुसरीकडे बहुजन समाज पक्ष किंवा राजेंद्र गवई यांच्या रिपब्लिकन गटासोबत जाण्याची शक्यता त्यांनी नाकारली. कॉंग्रेससोबत सर्व छोटे पक्ष एकत्र येतील, मात्र कॉंग्रेसकडून याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात येत नसल्याचेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

सामाजिक युद्ध भडकण्याची शक्यता

विद्यमान सरकार हिंदू राष्ट्र निर्मितीवर जोर देत आहे. काही हिंदूंनाही हिंदुराष्ट्र निर्मितीचे वेध लागले असून त्याच उद्देशाने आरक्षणाला विरोध, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याविरुद्ध आंदोलन सुरू आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करून त्यांना लढवण्याचे काहींचे धोरण आहे. यातून भविष्यात सामाजिक युद्ध भडकण्याची शक्यता आहे, याकडेही आंबेडकर यांनी लक्ष वेधले.

कामगारांना दडपण्यासाठी ‘शहरी नक्षलवाद’

भांडवलदारांना फायदा पोहोचवण्यासाठी व कामगार संघटनांचा आवाज दडपण्यासाठी ‘शहरी नक्षलवाद’ ही संकल्पना समोर केली जात आहे. ही संकल्पना सत्ताधारी पक्ष व पोलिसांची आहे. यातून सरकारला उद्योजकांना गोंजारायचे असून बेनामी संपत्ती जोडायची आहे, असा आरोपही आंबेडकरांनी केला.