तब्बल पाच महिने बंद असलेली शहरानजीकच्या मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनीचा भोंगा शुक्रवारी सकाळी पुन्हा वाजला खरा; परंतु केवळ ३०० जणांनाच कामावर रुजू करून घेतल्याने व उर्वरित सुमारे ११०० कामगारांना गेटच्या बाहेर अडविल्याने त्यांनी संताप व्यक्त करून कंपनी व्यवस्थापनाच्या नावाने अक्षरश: शिमगा केला. त्यामुळे या उर्वरित कामगारांना आवश्यकतेनुसार टप्प्या-टप्प्याने कामावर रुजू करून घेण्यात येईल, असे आश्वासन व्यवस्थापन व कंत्राटदारांच्या वतीने देण्यात आल्यानंतर वातावरण निवळले. दरम्यान, आठवडाभरापूर्वी भारतीय कामगार सेनेकडून सर्व कामगारांना हजर करून घेण्याचे, तसेच होळीसाठी प्रत्येकी २५०० रुपये अ‍ॅडव्हान्स देण्याचे आश्वासन हवेत विरले असल्याची तिखट प्रतिक्रिया संतप्त कामगारांनी व्यक्त केली.
जहाज बांधणी उद्योगात अग्रगण्य असलेली भारती शिपयार्ड कंपनी ऐन दिवाळीच्या तोंडावर बंद करण्यात आल्याने सुमारे १५०० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. दोन महिन्यांचे वेतन रखडल्याने २ नोव्हेंबरपासून कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले होते, तर कामगारांच्या पवित्र्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने ७ नोव्हेंबर रोजी टाळे ठोकले होते. कंपनी बंद झाल्याने कामगारांसह कंत्राटदारही अडचणीत सापडले. कंपनी पूर्ववत सुरू व्हावी यासाठी कामगार, कंत्राटदार, तसेच मिऱ्या येथील ग्रामस्थ एकवटले व त्यांनी व्यवस्थापनासोबत मुंबईत वारंवार बैठका घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याच वेळी शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेनेनेही व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली. अखेर सर्वाच्या या एकत्रित प्रयत्नांना यश आले आणि कंपनी सुरू करण्यास व्यवस्थापन राजी असल्याचे कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी रत्नागिरीत जाहीर केले.
महाडिक यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना सांगितले की, सर्व कामगारांना कंपनी पुन्हा सामावून घेणार असून, प्रत्येक कामगाराला २५०० रुपये ‘होळी अ‍ॅडव्हान्स’ देणार आहे. त्यानुसार शुक्रवारी २९ मार्च सकाळी कंपनीचा भोंगा वाजला. या वेळी कंपनीच्या गेटवर शेकडो कामगार उपस्थित होते.
मात्र केवळ २०० ते २५० कामगारांनाच कंपनीत प्रवेश देण्यात आला व जाहीर करण्यात आलेली अडीच हजारांची होळी भेट देण्यात आली, तर उर्वरित ११०० कामगारांना कंपनीच्या गेटवर रोखून धरण्यात आल्यामुळे तेथे तणावाचे वातावरण तयार झाले होते. या वेळी संतप्त कामगारांनी भा. का. सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडसुख घेतले. पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.