उद्योगमंत्री नारायण राणे त्यांचे चिरंजीव खासदार नीलेश यांच्या निवडणूक प्रचारासाठी सक्षम असल्यामुळे आपण तेथे प्रचाराला गेलो नाही, असा उपरोधिक खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील या निवडणुकीच्या प्रचारात जाधव कुठेच न फिरकल्याबद्दल त्यांच्या राजकीय विरोधकांकडून टीका होत आहे. त्यावर दिलेल्या स्पष्टीकरणात ते म्हणतात की, नारायण राणे हे सक्षम नेते आहेत. आपल्या मुलाचा मतदारसंघ सांभाळून ते राज्यात प्रचार करू शकतात. त्यामुळे मी तिथे जाऊन प्रचार करावा, अशी परिस्थिती नव्हती. त्यात आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कुठे गेले पाहिजे, हे आधीच निश्चित झाले होते. त्यात आपण सिंधुदुर्गात जाऊन प्रचारसभा घ्यावी, अशी कॉंग्रेस किंवा राणे यांचीही मागणी नव्हती. त्यामुळे आपण रायगडसह राज्याच्या अन्य भागातील आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या.
    रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ मंत्री सुनील तटकरे यांच्याशीही आपले मतभेद होते. पण पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोघांनाही एकत्र बसवून संघटित प्रचाराचे महत्त्व पटवून दिल्यामुळे आपण तटकरे यांचा प्रचार केला, असाही खुलासा प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.