रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि अजित माळी मित्रमंडळ, चेंढरे-अलिबाग व ग्रामस्थ चेंढरे-गोंधळपाडा यांच्या सहकार्याने चेंढरे येथे आयोजित करण्यात आलेल्या कै. भास्कर माळी स्मृती चषक कबड्डी स्पध्रेत बाजी मारत श्री विठ्ठल कोपरवाडा संघाने विजेतेपद पटकावले, तर कमळपाडा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कै. भास्कर माळी यांच्या स्मरणार्थ शुक्रवारी चेंढरे-गोंधळपाडा येथील भव्य क्रीडांगणावर या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्य़ातील ३२ नामांकित संघांना खेळविण्यात आल्याने कबड्डीप्रेमींना कबड्डीचा थरार पाहायला मिळाला.

यामध्ये श्री विठ्ठल कोपरवाडा संघ सरस ठरला. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत श्री विठ्ठल कोपरवाडा संघाने कमळपाडा संघाला मात दिली आणि विजेतेपद पटकावले. कमळपाडा संघ उपविजेता ठरला. म्हसोबा पेझारी संघ तृतीय तर धाविर बेलकडे संघ चतुर्थ आला. दिलखुश आवास संघाने शिस्तबद्ध संघाचे पारितोषिक पटकावले, तर शितळादेवी चौल संघाला सर्वोत्कृष्ट गणवेशाचे पारितोषिक देण्यात आले.

विजेत्या संघ व खेळाडूंना डोंबिवली महानगरपालिकेचे गटनेते राहुल दामले, पितृछाया ग्रुपचे उद्योगपती अभिजीत पाटील, वाडगावचे सरपंच जयेंद्र भगत, कार्यक्रमाचे आयोजक अजित माळी, सुजीत माळी, अ‍ॅड. राजीव माळी, परेश म्हात्रे, पाटील सर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

श्री विठ्ठल कोपरपाडा संघाला ३० हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक, उपविजेत्या कमळपाडा संघाला २० हजार रुपये रोख पारितोषिक व चषक तर तृतीय म्हसोबा पेझारी व चतुर्थ आलेल्या धाविर बेलकडे संघाला प्रत्येकी १० हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट खेळाडू, पब्लिक हिरो, शिस्तबद्ध संघ, उत्कृष्ट गणवेश अशी वैयक्तिक पारितोषिकांची लयलूट या वेळी करण्यात आली.