मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसची काही नेतेमंडळी नांदेडात असताना माजी खासदार व माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले खतगावकर गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षात अस्वस्थ होते. मात्र, वेगवेगळ्या पातळीवर मान मिळत नसल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. खतगावकर दोन वेळा खासदार, तीन वेळा आमदार व एकदा राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत होते. देगलूर, बिलोली, मुखेड, नायगाव आदी परिसरात खतगावकरांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशोक चव्हाण खतगावकरांची नाराजी दूर करतील, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना होता. पण चव्हाण यांच्या भेटीनंतर पक्ष सोडण्याच्या निर्णयावर ते ठाम राहिले.
गुरुवारी मुख्यमंत्री चव्हाण व स्थानिक नेते विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात मश्गूल असताना खतगावकर यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्या कार्यालयाकडे पाठवला. विविध पातळीवर काम करण्यास पक्षाने संधी दिल्याबद्दल ऋण व्यक्त करताना खतगावकर यांनी गेल्या काही महिन्यांत स्वकीयांकडूनच मानभंग होत असल्याचे पत्रात म्हटले आहे. खतगावकर यांच्या राजीनाम्यामुळे काही विधानसभा मतदारसंघांतील लोकप्रतिनिधी अस्वस्थ झाले आहेत. देगलूर, नायगाव व मुखेड मतदारसंघांत खतगावकरांचा पक्षप्रवेश विद्यमान आमदारांना तापदायक ठरू शकतो. खतगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार, हे जवळपास निश्चित आहे. पण त्याचा मुहूर्त अजून निश्चित झाला नाही.