धावा केला धावा। श्रम होऊ नेदी जीवा।
वर्षे अमृताच्या धारा। घेई वोसंगा लेकरा।
उशीर तो आता। न करावे हे चिंता।
तुका म्हणे त्वरे। वेग करी विश्वंभरे।
बोरगावकरांच्या निरोप घेऊन संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज सकाळी पिराची कुरोलीचे प्रस्थान ठेवले. निरोप देताना बोरगावकर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रथेप्रमाणे मोठय़ा संख्येने बोरगावकर पालखीसोबत पंढरपूरला जातात. पालखी सोहळ्यातील भाविकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. आता गावागावातूनही गावकरी दिंडी काढूनच पंढरपूरला जात असल्याने पालखी बरोबर वाखरीपर्यंत अनेक दिंडय़ाही मोठय़ा संख्येने सहभागी होत असल्याने या वर्षी पंढरपूरला आषाढी एकादशीला भाविकांची विक्रमी संख्या असण्याचा अंदाज आहे.
साक्षात विठुरायाचे पंढरपूर अगदी जवळ आल्याने अत्यंत उत्साहाने वैष्णवांची पावले हरिनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने पडत होती. ढगाळ वातावरण हवेतील गारवा आणि सततच रिमझिम पाऊस अंगावर झेलत, माळखांबी येथे पालखी सोहळा विसावला. फटाके वाजवून, पुष्पवृष्टी करून पालखी सोहळ्याचे स्वागत माळखांबीकरांनी भक्तिभावाने केले.
टाळ, मृदंगांचा नाद, अखंड हरिनामाचा गजर आणि ज्ञानोबामाउली-तुकाराम असा जयघोष करीत सोहळा मार्गाक्रमण करीत असताना तोंडले-बोंडले येथे लाखो वैष्णावांनी संथ चालणाऱ्या पावलांची गती वाढविली आणि एक लयबद्ध दौड करीत धावा केला. दरवर्षी येथे वैष्णव पावलांची गती वाढवून विठुरायासाठी धावा करतात. संत तुकाराम महाराज पायी वारी करीत असताना या ठिकाणी धावले होते. त्यांनीही विठुरायासाठी मन व्याकूळ करून येथे धावा केला होता, अशी आख्यायिका आहे. दरम्यान, टप्पा येथे पंढरपूर तालुक्याच्या हद्दीवर पंढरपूर तालुक्याच्या वतीने पंढरपूरचे आमदार भारत भालके व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. विठुरायाच्या परिसरात आपण आल्याची भावना वैष्णवांमध्ये जाणवत होती. पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता टप्प्यावरील स्वागत स्वीकारत आहेत. पिराची कुरोली (गायरान) येथे आज सायंकाळी विसावला. दरम्यान उद्या बुधवारी बाजीराव विहीर येथे पालखी सोहळ्याचे उभे रिंगण असून संतांची मांदियाळी वाखरीत दाखल होणार आहे.