महापालिकेतर्फे नागरिकांना देण्यात येणारा औषधसाठा चक्क शौचालयात ठेवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालिकेने मात्र सारवासारव करत तात्पुरत्या स्वरूपात ही औषधे शौचालयात ठेवल्याचे सांगितले.

मीरा भाईंदर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक ६ कार्यालय मीरा रोड येथील रसाज परिसरात आहे. या प्रभाग कार्यालयाच्या इमारतीत  तळमजल्यावर आरोग्य केंद्र आहे. तर दुसऱ्या मजल्यावर शाळा आणि तिसऱ्या मजल्यावर पालिकेचे प्रभाग कार्यालय आहे. मात्र या कार्यालयाच्या तळ मजल्यावर शौचालय आहे. या शौचालयात आरोग्य विभागाने पोलिओच्या लसी असलेले डबे ठेवले आहेत. शौचालयात ठेवण्यात आलेल्या वैद्यकीय डब्यात पोलिओ त्याचप्रमाणे इतर औषधांची लस  ठेवण्यात आली आहे. पालिकेकडे इतक्या मोठय़ा प्रमाणात जागा उपलब्ध असताना अशा प्रकारे शौचालयात औषधसाठा ठेवणे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी केला आहे.  हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालिकेने सारवासारव केली आहे. कार्यालयातील स्वच्छता सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात हा औषधसाठा शौचालयात ठेवण्यात आला होता, अशी माहिती मुख्य आरोग्य अधिकारी प्रमोद पडवळ यांनी दिली.  या औषधसाठय़ामध्ये पोलिओच्या लसी तसेच इतर महत्त्वाची औषधे होती. औषधे विशिष्ट तापमानात आणि र्निजतुक केलेल्या वातावरणात ठेवावी लागतात. अन्यथा त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. पालिका  हलगर्जीपणा करत असेल तर त्या औषधाचा फायदा होण्याऐवजी रुग्णांना त्रासच होईल, असे नागरिकांनी सांगितले. असा हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.