मीरा-भाईंदर शहरात एकीकडे करोना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना दुसरीकडे करोना मुक्त रुग्णांचे प्रमाण देखील वाढले आहे. आजवर तब्बल ८८.१० टक्के रुग्णांना करोना मुक्त करण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाले असून रुग्ण दुपटीचा वेग २९ दिवसांवर गेला आहे.
शहरात बाधित रुग्णांची संख्या १९हजार ९४२ वर पोहचली आहे.तर आता पर्यंत ६१६ रुग्णाचा करोनामुळे बळी गेला आहे.अश्या परिस्थितीत रुग्ण संख्या आटोक्यात आणणे आणि रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना करोनामुक्त करण्याचे आवाहन पालिका प्रशासना समोर आहे. त्यामुळे प्रति दिवस शंभरच्या गतीने वाढणाऱ्या रुग्णांना देखील योग्य उपचार करून घरी पाठवण्यात येत आहे.
टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर मिरा भाईंदर शहरात रुग्ण संख्या वाढीचा आलेख झपाटयाने वर जाताना आढळून आला होता.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु गेल्या सहा महिन्यापासून बाधित रुग्णांना योग्य उपचार करून करोनामुक्त करण्यात येत आहे.त्यामुळे करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण आता सरासरी ८८.१० टक्के झाले आहे. तर करोना बाधित रुग्णांचे प्रमाण ८.८२ टक्के आणि करोना बळी रुग्णांचे प्रमाण ३.०९ एवढे झाले आहेत. नागरिकांनी कठोर पणे नियमांचे पालन केल्यास हे प्रमाण लवकरच कमी करून करोनावर यश प्राप्त करण्यात येईल अश्या विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 12:33 am