Bhayyuji Maharaj commits suicide : भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे.

भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे.

भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत.

भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती.

भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.