संभाजीराव भिडे गुरुजी यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा संपण्यापूर्वी ते बाहेर पडले होते. सभेनंतर त्यांचे पंतप्रधानांशी फोनवरून बोलणे देखील झाले. त्यांना मोदी आणि उदयनराजे भोसले यांना सातारास्थळी एकत्र बसलेले पाहायचे होते. हा क्षण अनुभवल्यावर ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाल्याचे ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे जिल्हा संघटक काशिनाथ शेलार यांनी सांगितले. पंतप्रधान आणि भिडे गुरुजी या दोघांमध्ये उत्तम संवाद असून त्यांच्या सभेतून जाण्याबद्दलचे वृत्त देताना ते नाराज झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि आठ विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी यांची गुरुवारी सातारा येथे सभा पार पडली. या सभेला सातारा परिसरातील  नागरिकांसह महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान’च्या धारकऱ्यांची मोठी गर्दी होती. ही सभा सुरू असताना सभामंडपामध्ये ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांचे आगमन झाले. त्यांना विशेष व्यक्तींच्या कक्षांमध्ये जागा ठेवण्यात आली होती. भिडे गुरुजी यांना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवरायांचे वंशज उदयनराजे यांना एकाच व्यापीठावर बसलेले पाहायचे होते. हा क्षण अनुभवल्यावर थोड्या वेळानंतर पंतप्रधान मोदींचे भाषण संपत आलेले असताना भिडे गुरुजी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

वास्तविक पंतप्रधान मोदी आणि भिडे गुरुजी यांची प्रत्यक्ष भेट होणार होती. परंतु वेळेअभावी ही भेट शक्य झाली नाही. मात्र सभेनंतर पंतप्रधान रवाना होताच त्यांचे भिडे गुरुजींबरोबर फोनवरून बोलणे झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देखील प्रत्यक्ष भेट होऊ न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली तसेच, ही निवडणूक संपल्यावर पंतप्रधानांनी भिडे गुरुजींना दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले असल्याचेही ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने सांगण्यात आले आहे.