भिकू इदाते यांचे मत; स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भ्रांत हिंदी राष्ट्रवाद अग्रभागी राहिल्याने आणि हिंदू राष्ट्रवादाला अशास्त्रीय, अनैतिक व चर्चाबाह्य़ मानण्यात आल्याने पाकिस्तानची निर्मिती झाली, असे प्रतिपादन २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व राष्ट्रीय भटक्या-विमुक्त जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू ऊर्फ दादा इदाते यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई) व स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई) यांच्या सहकार्याने येथील रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षीय भाषणात इदाते म्हणाले की, काँग्रेसने हिंदुत्वाचा आणि हिंदू राष्ट्रवादाचा त्याग करून सर्वसमावेशक प्रादेशिक हिंदी राष्ट्रवादाचा स्वीकार केल्याने सामाजिक एकात्मता निर्माण झाली, तसेच शस्त्रवादाचा त्याग करून अहिंसेचा स्वीकार केल्याने आणि स्वातंत्र्य चळवळीचे लोण छोटय़ा छोटय़ा कार्यक्रमांद्वारे तळागाळापर्यंत पोचवल्याने सर्वसामान्य जनता भयमुक्त आणि स्वातंत्र्याच्या अनिवार इच्छेने कार्यप्रवृत्त झाली, परिणामी ब्रिटिशांना गाशा गुंडाळावा लागला, असा युक्तिवाद प्रातिनिधिक स्वरूपात केला जातो. मात्र भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भ्रांत हिंदी राष्ट्रवाद अग्रभागी राहिल्याने, हिंदू राष्ट्रवादाला अशास्त्रीय, अनैतिक आणि चर्चाबाह्य़ मानण्यात आल्याने आंदोलनाची परिणती देशाच्या फाळणीत आणि पाकिस्तान निर्मितीत झाली आहे. म्हणून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे वैचारिक अधिष्ठान आणि उद्दिष्टे राष्ट्रहित साधण्यास अनुकूल होती का, याचा नव्याने विचार व्हायला हवा असेही भिकू इदाते यांनी
सांगितले.