‘शाळा सुटली त्यावेळीपासूनच पुस्तकाची साथ सुटली होती, ‘पुस्तकांच्या गावा’मुळे आम्हा शेतक ऱ्यांच्या जगण्यात या कथा, कादंबऱ्यांनी पुन्हा प्रवेश केला आहे.’, ‘पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज ही नावं ऐकली होती, पण आज त्यांची पुस्तके हाताळायला मिळत आहेत.’ ‘गावात पुस्तकं आली, ती बघायला पर्यटक येतील, पण त्याहीपेक्षा आमची पोरंसोरंपण ही बुकं वाचतील, मोठी होतील..’ या आणि अशाच प्रतिक्रिया आज भिलार गावातील घराघरांमध्ये ऐकायला मिळत होत्या.

भारतातील पहिले पुस्तकांचे गाव ‘भिलार’ आजपासून या आगळय़ा वेगळय़ा उपक्रमात रुजू झाले आहे. या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी झाले. पण तत्पूर्वी सकाळपासून गावात फेरफटका मारला असता घराघरांतून ही अशी चर्चा ऐकायला मिळत होती.

महाबळेश्वरजवळील या गावातील २८ घरांमधून ही पुस्तक पर्यटनाची कल्पना राबविली आहे. यातील २५ घरे ही सर्व पुस्तके लावून आजपासून पर्यटकांच्या स्वागतासाठी तयार झाली आहेत. या घरातील खोल्या, ओसऱ्या, माजघरांमध्ये ही पुस्तके लावली आहेत. ज्या घरांमध्ये पूर्वी संसारउपयोगी भांडी, साहित्य, शेतीची अवजारे होती, तिथे त्या जोडीने ही पुस्तकाची मांडणी पाहणाऱ्याबरोबर त्या घर मालकालाही काहीसा धक्का देत असतात. गेले ८ दिवस या उपक्रमाची तयारी, पुस्तकांची मांडणी हे सारे करत असताना भिलारवासीयांचीच पहिल्यांदा या पुस्तकांशी गट्टी झाली आहे. त्याचाच प्रत्यय त्यांच्या बोलण्यातून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून तर गावातील चर्चेत पुस्तक हाच विषय आहे. तुमच्याकडे कुठली पुस्तके आली, आमच्याकडे कुठली. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, रणजित देसाई, विश्वास पाटील ही आणि अशा  लेखकांची नावे गावातून बागडू लागली आहेत. गावातील वयस्कर ग्रामस्थ सहज बोलतात, ‘आम्ही नाही फार शिकलो, पण आता या पुस्तकांच्या वेडापायी आमची पुढची पिढी शिकेल, मोठी होईल’ कुणी म्हणते, ‘आजपर्यंत वाईला शिक्षणाची पंढरी म्हणायचो, आता आम्ही ते भिलारला करू’ एरवी राजकारणात रमणारे हे ग्रामस्थ सध्या या अशा पुस्तकांच्या दुनियेत रमले आहेत.

या उपक्रमासाठी भिलारची निवड झाली त्या वेळी गावकऱ्यांच्या मनात या उपक्रमाबद्दल साशंकता होती. पण ग्रामसभेत या उपक्रमाबद्दल शासनाच्या प्रतिनिधींनी सविस्तर माहिती दिली आणि याला चालना मिळाली. यात सहभागी सर्व गावक ऱ्यांनी आपल्या घरातील हजार ते पंधराशे चौरस फूट जागा विनामोबदला उपलब्ध करून दिली आहे. या पुस्तकांच्या आणि त्यापाठी येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी घरांना रंगरंगोटी केली आहे. शासनाच्यावतीनेही गावातील सार्वजनिक जागांची स्वच्छता, सुशोभीकरण केल्यामुळे सारे गावच या पुस्तक सोहळय़ात बुडाले आहे.

आज या उपक्रमाचा प्रारंभ होणार होता. त्यावेळी तर साऱ्या भिलारवासीयांनी आपआपल्या घरांपुढे रांगोळ्या काढळ्या होत्या. गुढय़ा – तोरणे लावली होती. भिंतीवर पुस्तके, लेखकांची नावे लिहिली होती. या कार्यक्रमासाठी गावात आलेल्या सरकारी पाहुण्यांपासून ते पर्यटकांपर्यंत प्रत्येकजण हे सारे कुतूहलाने पाहात होते. पुस्तकांचे हे गाव खऱ्या अर्थाने पुस्तकात बुडाले होते.